esakal | पिंपरी-चिंचवड महापालिकेचे येस बॅंकेत अडकले ९८४ कोटी

बोलून बातमी शोधा

चिंचवड - येस बॅंकेत पैसे काढण्यासाठी नागरिकांनी केलेली गर्दी.

महापालिकेचे १६ करसंकलन कार्यालये आहेत. त्यांच्यामार्फत गोळा होणारी रक्कम ऑगस्ट २०१८ पासून येस बॅंकेतील महापालिकेच्या खात्यात जमा केली जात आहे. मात्र, आरबीआयने बॅंकेवर एक महिन्यासाठी निर्बंध आणले. त्यामुळे गुरुवारपर्यंत (ता. ५) जमा झालेले सुमारे ९८४ कोटी रुपये बॅंकेत अडकले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे येस बॅंकेत अडकले ९८४ कोटी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी पिंपरी - रिझर्व बॅंकेने (आरबीआय) निर्बंध घातलेल्या येस बॅंकेत महापालिकेचे सुमारे ९८४ कोटी रुपये अडकलेत. ही सर्व रक्कम दैनंदिन कर संकलनाची असून कंत्राटी कर्मचाऱ्यांमार्फत ती गोळा केली जात होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिकेचे १६ करसंकलन कार्यालये आहेत. त्यांच्यामार्फत गोळा होणारी रक्कम ऑगस्ट २०१८ पासून येस बॅंकेतील महापालिकेच्या खात्यात जमा केली जात आहे. मात्र, आरबीआयने बॅंकेवर एक महिन्यासाठी निर्बंध आणले. त्यामुळे गुरुवारपर्यंत (ता. ५) जमा झालेले सुमारे ९८४ कोटी रुपये बॅंकेत अडकले आहेत. राष्ट्रीयकृत बॅंकेऐवजी खासगी बॅंकेत करभरणा करण्यास जबाबदार असलेले अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे व विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन चिंचवडे आणि सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

आता पुणे होणार क्रीडानगरी; अजित पवारांची मोठी घोषणा

शहरात पैसे काढण्यासाठी झुंबड
चिंचवड येथील शाखेत शुक्रवारी (ता. ६) सकाळपासूनच खातेदारांची पैसे काढण्यासाठी झुंबड उडाली होती. काहीजणांना पैसे दिल्यानंतर अन्य खातेदारांना केवळ टोकन देण्यात आले. ज्यांना पैसे मिळाले नाहीत ते संतप्त झाले होते. त्या सर्वांना शनिवारी (ता. ७) पैसे देण्यात येतील, असे बॅंकेच्या वतीने सांगण्यात आले. अनुचित प्रकार घडू नये म्हणून चार पोलिसही तैनात करण्यात आले होते. दुपारी साडेचारपर्यंत बंदोबस्त होता. 

हिंजवडी बॅंकेचे कामकाज बंदच
हिंजवडी - हिंजवडी, वाकडसह आयटी परिसरातील ग्राहकांची चांगलीच पंचाईत झाली. शुक्रवारी (ता. ६) सकाळपासूनच खातेदारांनी बॅंकेच्या हिंजवडी, वाकड येथील शाखांमध्ये गर्दी केली होती. ऑनलाइन व्यवहारही ठप्प झाल्याने रोकड संपल्याचे कारण सांगून दुपारनंतर बॅंकांच्या शाखांचे कामकाज बंद करण्यात आले. ऐन पगाराच्या कालावधीत हा प्रकार समोर आला. अनेक कंपन्यांतील कर्मचारी बॅंकेच्या शाखेत पगार काढण्यासाठी आले होते. पगार जमा होऊनही पैसे काढता येत नसल्याने निराश झालेले शेकडो ग्राहक संतप्त झाले होते. हिंजवडीतील एका आयटी कंपनीच्या दीड हजार कामगारांचे पगार गुरुवारी कामगारांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले. दत्ता पांचाळ म्हणाले, ‘‘या बॅंकेचा नेमका काय घोटाळा झाला हे माहीत नाही. आमचे नाव नंबर लिहून घेतले आहेत. रोकड आली की, कळविण्यात येईल, असं बॅंकेकडून सांगण्यात आले.’’

अन्य बॅंकांचे मार्केटिंग
येस बॅंकेचे व्यवहार ठप्प झाल्याने निराश झालेल्या ग्राहकांना पटविण्यासाठी अन्य बॅंकांच्या मार्केटिंग प्रतिनिधींनी येस बॅंकेच्या शाखेबाहेर गर्दी केली होती. ‘तुम्ही आमच्याकडे खाते काढा, आम्ही चांगल्या सेवा व सुख सुविधा देऊ,’ असे ते सांगत होते; तर दुसरीकडे ‘तुमच्या खात्यावरील पैसे सुरक्षित आहेत. काळजी करू नका, सर्वकाही सुरळीत होईल, असे आश्वासन येस बॅंकेच्या वाकड शाखेच्या व्यवस्थापक चौकशीसाठी आलेल्या ग्राहकांना देत होत्या.