अरे बापरे! पहा पिंपरी-चिंचवड पालिकेचा अजब कारभार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 डिसेंबर 2019

आरोग्य विभागाची माझ्याकडे जबाबदारी येण्यापूर्वीच काही कीटक-जंतुनाशके कालबाह्य झाली होती. त्यामुळे प्रत्येक विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या मागणीनुसार कीटक-जंतुनाशके औषधांची मागणी भांडार विभागाकडे केली. भांडार विभागाने आरोग्य विभागाला शिल्लक औषधांच्या वापराविषयी वेळोवेळी कळविणे गरजेचे आहे.
- डॉ. अनिल रॉय, पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी

भोसरी - पालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाने वेळेत वापर न केल्याने एक कोटी एक लाख ६० हजारांची कीटक व जंतुनाशके कालबाह्य झाल्यामुळे फेकण्याची वेळ आली आहे. मात्र, पुन्हा आरोग्य विभागाच्या मागणीनुसार आता ९१ लाखांची खरेदी केली आहे. त्यामुळे आता तरी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

आरोग्य विभागाच्या मागणीनुसार भांडार विभाग कीटकनाशके खरेदी करतो. मात्र, ती वेळेत न वापरल्याने कालबाह्य होत असल्याचे भांडार विभागाचे म्हणणे आहे. कालबाह्य कीटकनाशकांबाबत भांडार विभागाकडून कळविले जात नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. या दोन्ही विभागात समन्वय नसल्याने जनतेचा पैसा वाया जात असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. पालिकेद्वारे परिसरातील डास, डेंगीच्या अळ्या, कीटक, जंतू यांचा संहार करण्यासाठी कीटक-जंतू नाशके खरेदी केली जातात. गटार, नाले, स्वच्छतागृहे दुर्गंधीयुक्त परिसरात फवारणीसाठी कीटकनाशक पावडर, त्याचप्रमाणे स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठीही औषधे खरेदी केली जातात. मात्र, या औषधांच्या खरेदीनंतर त्यांचा वेळोवेळी वापर न केल्याने फेब्रुवारी २०१६ ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत एक कोटी एक लाख साठ हजार रुपयांची कीटकनाशके कालबाह्य झाल्याने भांडार विभागात वापराविना पडून आहेत.

पावसाळ्यात कीटकनाशकांची मागणी असताना व आरोग्य विभागाकडे पुरेपूर साठा असतानाही त्याचा वापर केला गेला नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाचे सहायक आयुक्त मंगेश चितळे म्हणाले, ‘‘आरोग्य विभागाने मागणी केल्यानंतरच भांडार विभागाद्वारे कीटक-जंतुनाशके खरेदी केली जातात. त्यामुळे आरोग्य विभागाने मागविलेली औषधे नियोजित वेळेत उपयोग करणे गरजेचे आहे. भांडार विभागाद्व्रारे शिल्लक जंतू-कीटकनाशकाबद्दल वेळोवेळी आरोग्य विभागाशी पत्रव्यवहारही केला आहे.’’

माहिती अधिकार कार्यकर्ते वसंत रेंगडे म्हणाले की, कीटक-जंतुनाशकाची मागणी नसताना आरोग्य विभागाच्या मागणीनुसार भांडार विभागाने औषधे खरेदी केल्याने ती औषधे मुदतबाह्य झाली आहेत. नुकतेच बॅक्‍टोडेक्‍स औषधांची खरेदी क्षेत्रीय कार्यालयांतील आरोग्य विभागाच्या २०१८-१९ साठी मागणी शून्य असताना ९१ लाखांची खरेदी करण्यात आली. त्यामुळे या खरेदीविषयी प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. आता ही कीटकनाशके त्यांच्या कालबाह्य मुदतीपूर्वी महापालिकेने वापरणे गरजेचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri chinchwad municipal issue