पिंपरी-चिंचवडमध्ये सोसायट्यांची धाव आता बोअरवेलकडे

पिंपरी - एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाल्यावर गैरसोय नको, म्हणून शहरातील सोसायट्यांनी बोअरवेल घेण्यास सुरुवात केली आहे.
पिंपरी - एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाल्यावर गैरसोय नको, म्हणून शहरातील सोसायट्यांनी बोअरवेल घेण्यास सुरुवात केली आहे.

पिंपरी - शहरवासीयांना सोमवारपासून (ता. २५) दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने जाहीर केला. त्यामुळे पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी अनेक सोसायट्या आणि बंगलेधारकांनी बोअरवेल (कूपनलिका) घेण्यास सुरुवात केली आहे.

बोअरवेलमधून पाणी उपलब्ध झाल्यानंतर एक दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा त्रास जाणवणार नसल्याची भावना काही नागरिकांनी व्यक्‍त केली. शहरात उंचावर असणाऱ्या इमारतींमध्ये वरच्या मजल्यांपर्यंत पाणी पोचण्यात अडचण येते. तेथे पालिकेकडून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे सोसायट्यांना रोज टॅंकरवर अवलंबून राहावे लागते. 

दरम्यान, मोरवाडी, पिंपरी, चिंचवड, प्राधिकरण, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव या भागातील पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. त्यामुळे या भागातील अनेक सोसायट्या बोअरवेल घेण्यास प्राधान्य देत आहेत. रोज टॅंकरने गरज भागविणाऱ्यांसाठी होणाऱ्या खर्चापेक्षा बोअरवेल घेण्यास पैसे खर्च करण्याकडे अनेकजणांचा ओढा आहे. 

पाण्याचे नियोजन सुरू
शहरातील सर्व भागांमध्ये समप्रमाणात पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महापालिकेकडून सोमवारपासून (ता. २५) एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे सोसायट्यांनी पाण्याच्या काटकसरीचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. 

महापालिकेचे सर्व कर नियमितपणे भरूनही पाणी पुरेसे मिळत नसल्याने सोसायटीधारकांमध्ये काही महिन्यांपासून असंतोषाचे वातावरण आहे. यासंदर्भात सोसायटीधारकांच्या महापालिका अधिकाऱ्यांसमवेत अनेक बैठकाही झाल्या. मात्र त्यातून अद्याप काहीही निष्पन्न झालेले नाही.

पाण्याचा काटकसरीने कसा वापर करता येईल, याबाबत सोसायटीधारकांनी चाचपणी सुरू केली आहे. दरम्यान, सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा झाल्यावर किती वेळ पाणी देण्यात येणार, पाण्याचा दाब कसा असेल, नेमके किती पाणी मिळेल या सर्व बाबी स्पष्ट होतील. त्यानंतरच पाणी किती काटकसरीने वापरायचे, राखीव साठा म्हणून किती ठेवायचे याचा निर्णय सोसायट्या घेणार आहेत. पालिकेकडून मिळणाऱ्या पाण्यात आणखी कपात केल्यास पाण्याची साठेबाजी वाढण्याचीही शक्‍यता काही सोसायट्यांमधील सभासदांनी व्यक्त केली. तसेच पाण्याचे असमान वाटप होऊन समस्या आणखी जटिल होऊ शकते.

ज्या दिवशी पाणी देण्यात येईल, ते दोन दिवस पुरेल का, याबाबत आम्ही चाचपणी करणार आहोत. पाणी किती वेळ व प्रमाणात मिळते याची पाहणी करून पुढील निर्णय घेण्यात येईल.
- अरुण देशमुख, प्रवक्ते, पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com