निगडीमध्ये पादचारी महिलेची सोनसाखळी हिसकावली

निगडीमध्ये पादचारी महिलेची 
सोनसाखळी हिसकावली
Published on

पिंपरी : पायी चालत जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावली. ही घटना निगडी प्राधिकरणातील सेक्टर २५ मध्ये घडली. या प्रकरणी संबंधित महिलेने निगडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दोन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी महिला पती आणि नातवासोबत रात्रीच्या वेळी पायी चालत जात होत्या. त्यावेळी समोरून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दोघेजण त्यांच्याजवळ आले. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या चोरट्याने फिर्यादीच्या गळ्यातील एक लाख २५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावली.

दारूसाठी पैसे देण्यास नकार; तरुणाला मारहाण
पिंपरी : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून तिघांनी एका तरुणाला विटा आणि फरशीच्या तुकड्याने मारहाण करून जखमी केले. ही घटना बोपखेल येथील रामनगर येथे घडली. या प्रकरणी अविनाश गायकवाड (रा. सीएमई, दापोडी) यांनी दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तुषार उर्फ भैय्या प्रकाश डोंगरे (रा. बोपखेल), शेखर कांबळे (रा. बोपखेल) आणि करण उर्फ बबलू कांबळे यांना अटक केली आहे. आरोपी तुषार याने फिर्यादीकडे दारू पिण्यासाठी पाचशे रुपयांची मागणी करत मारहाण करण्याची धमकी दिली. त्यामुळे फिर्यादीने पाचशे रुपये दिले. मात्र, आरोपींनी पुन्हा पैशांची मागणी केली. फिर्यादीने नकार दिला असता तुषारने त्यांना शिवीगाळ करत विटेच्या तुकड्याने डोक्यात व पायावर मारले. तर आरोपी शेखर याने फिर्यादीच्या पायावर फरशीचा तुकडा मारला, तर तिसऱ्या आरोपीने सिमेंटच्या पत्र्याने फिर्यादीच्या पाठीत मारहाण केली.

चार्जर न दिल्याने दुकानदाराला मारहाण
पिंपरी : मोबाइल चार्जर न दिल्याच्या कारणावरून तीन जणांनी एका मेडिकल दुकानदाराला स्टीलच्या कड्याने मारहाण करून जखमी केले. ही घटना चिंचवड, संभाजीनगर येथील प्राईम मेडिको शॉपमध्ये घडली. या प्रकरणी विजय लादाराम चौधरी (रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बबलू म्हस्के, आदिनाथ गायकवाड आणि नवनाथ वाघमारे (सर्व रा. चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी त्यांच्या मेडिकलमध्ये असताना आरोपींनी त्यांच्याकडे मोबाइल चार्जर मागितले. फिर्यादीने चार्जर देण्यास नकार दिल्याने आरोपींनी हातातील स्टीलच्या कड्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तरुणाचा मोबाइल, ब्रेसलेट लंपास
पिंपरी : मोकळ्या मैदानात झोपलेल्या एका तरुणाचा मोबाइल आणि चांदीचे ब्रेसलेट चोरट्याने लंपास केले. ही घटना पिंपरी चौक येथील एका स्मारकाच्या मागील बाजूस असलेल्या मैदानात घडली. या प्रकरणी अनिकेत सुधाकर सोनवणे (रा. बोपोडी) यांनी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे पिंपरी येथील एका स्मारकाच्या पाठीमागील बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात झोपलेले असताना त्यांचा मोबाइल आणि हातातील चांदीचे ब्रेसलेट अज्ञात चोरट्याने चोरून नेले.

तरुणावर वार केल्याप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : माझ्या नातेवाईक महिलेशी फोनवर का बोलतोस, असे विचारून एकाने तरुणावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना विकासनगर, किवळे येथे घडली. या प्रकरणी ३४ वर्षीय व्यक्तीने देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ३१ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. फिर्यादी आणि आरोपी एकाच इमारतीत राहतात. फिर्यादी टेरेसवर गेले असताना आरोपी तिथे आला. त्याने फिर्यादीला आपल्या नातेवाईक महिलेशी फोनवर बोलण्यावरून जाब विचारला. त्यानंतर त्याने सोबत आणलेल्या चाकूने फिर्यादीच्या पायावर आणि पोटावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com