गणेशोत्सवाची लगबग; मंडळांची तयारी अन् पोलिसांची नजर!

गणेशोत्सवाची लगबग; मंडळांची तयारी अन् पोलिसांची नजर!
Published on

पिंपरी, ता. २५ : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने शहरातील गणेश मंडळांसह पोलिस प्रशासनाचीही लगबग सुरू झाली आहे. उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा, यासाठी पोलिसांकडून गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेण्यात येत आहेत. त्याचवेळी मंडळांकडूनही देखावे, विद्युत रोषणाई, सजावट, मिरवणूक तसेच स्वयंसेवकांच्या नियोजनाला वेग आला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांमध्ये पोलिसांकडून मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. यामध्ये पोलिस ठाणे, परिमंडळ तसेच आयुक्तालय स्तरावर बैठकीचे नियोजन केले जात आहे. उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन व्हावे, याबाबत मंडळांना सूचना दिल्या जात आहेत. तसेच मंडळांनी आवश्यक त्या परवानग्या घेऊनच उत्सवाचे आयोजन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, गणेश मंडळांनीही उत्सवाच्या तयारीला वेग दिला आहे. आकर्षक देखावे, पर्यावरणपूरक सजावट, सामाजिक संदेश देणारे उपक्रम, आरोग्य शिबिरे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. देखाव्यांमध्ये हलते व जिवंत देखावे सादर करण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणी स्वयंसेवकांची नियुक्ती, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यावरही भर दिला जात आहे.
गणेशोत्सवातील प्रमुख मिरवणुकांच्या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलिस आणि मंडळांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय ठेवण्यावर भर दिला जात आहे. मंडळांनी वेळेचे आणि ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबतचे नियम पाळावेत, तसेच नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना बैठकीतून देण्यात येत आहेत.

नियमांचे पालन करण्याचे आवाहन
गणेशोत्सव हा उत्साहाचा आणि सामाजिक एकोप्याचा सण आहे. त्यामुळे उत्सव साजरा करताना कायदा व सुव्यवस्थेला बाधा येणार नाही, याची दक्षता घ्यावी. पोलिस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

‘‘गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आमच्या मंडळासह सर्वच मंडळांची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. हलते तसेच जिवंत देखावे मंडळांकडून सादर केले जात असल्याने देखावे उभारणीची लगबग सुरू आहे. प्रशासनाकडून मिळणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.
- राजाभाऊ गोलांडे, अध्यक्ष, गांधी पेठ तालीम मित्र मंडळ, चिंचवडगाव

‘‘पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत अनेक सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. दरम्यान, आगामी गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी आयुक्तालय स्तरावर जोरदार तयार सुरू आहे. सर्व पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत पोलिस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
- धीरज पाटील, पोलिस उपायुक्त, विशेष शाखा, पिंपरी चिंचवड
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com