ट्रॅफिकमुळं तीन विद्यार्थ्यांचा दहावीचा पेपर चुकला; पालकांनी येथे घेतली धाव

टीम ई-सकाळ
Saturday, 29 February 2020

शहरातील खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे तीन विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाल्याने शाळा व्यवस्थापनाने त्यांना परीक्षेस मज्जाव केला.

पिंपरी  : वाकड येथील सीबीएसई' बोर्डाच्या एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये उशीर झाल्याने तीन विद्यार्थ्यांना दहावीची परीक्षा देण्यापासून मज्जाव केला आहे. प्रचंड गयावया करूनही संबंधित शाळेने विद्यार्थ्यांवर दया दाखविली नाही. या प्रकरणी पालकांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे कैफियत मांडली आहे. मात्र, दुसरीकडे शहरातील खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे या तिन्ही विद्यार्थ्यांना परीक्षेपासून राहण्याची वेळ आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मोशी परिसरातील हे तिन्ही विद्यार्थी रहिवासी असून शेजारच्याच सीबीएसई बोर्डाच्या शाळेत शिकण्यास आहे. परंतु तमन्ना सुभाष शर्मा, ओम्‌कार संतोष शिंदे, पायल किरण उढाणे हे तिन्ही विद्यार्थी वाकडमधील इंटरनॅशनल स्कूलच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देत आहेत. बुधवारी (ता.26) त्यांचा इंग्रजी विषयाचा पेपर होता. परंतु, शहरातील खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे तीन विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाल्याने शाळा व्यवस्थापनाने त्यांना परीक्षेस मज्जाव केला. पालकांच्या म्हणण्यानुसार सकाळचे दहा वाजण्यास काही मिनिटांचा अवधी बाकी होता. गेट पोचल्यावर वॉचमनने त्यांच्या तोंडावर फाटक बंद केल्याने पालक हताश झाले आहेत. मोशी ते वाकड शाळा अंतर अंदाजे 20 किलोमीटरच्या आसपास आहे. शाळेपासून ते परीक्षा केंद्र या मार्गावर कायमच ट्रॅफिक असते. संबंधित मुख्याध्यापक व शाळेतील शिक्षकांकडे अनेकदा विनंतीवरूनही त्यांनी गेट उघडले नाही. या सगळ्या बाचाबाचीमध्ये दहा मिनिटांचा वेळ वाया गेल्याचे पालकांनी अतितातडीचे विनंती अर्जात नमूद केले आहे.

पुण्याच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा 

मुलांवर दया करावी
या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार आहे. भविष्यात त्यांना दुसऱ्या शाळेतदेखील प्रवेश मिळण्यास अडचणी येतील. या प्रकारामुळे मुलांना मानसिक धक्का बसला आहे. त्यांच्यात निराशा वाढली आहे. तरी या विद्यार्थ्यांना चालू परीक्षेच्या कालावधीत सुट्टी किंवा अतिरिक्त वेळेत इंग्रजी विषयाची परीक्षा घ्यावी. या संस्थेच्या चुकीच्या नियमांमुळे घर ते परीक्षा केंद्राचे अंतर पाहता मुलांना नवीन संधी द्यावी. अशी विनंतीवजा मागणी तिन्ही पालकांनी केली आहे.

पुण्याच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा 

"त्या' विद्यार्थ्यांना मिळणार जूनमध्ये परीक्षेची संधी
उशीर झाल्याने तीन विद्यार्थ्यांना दहावीचा इंग्रजीचा पेपर देण्यास मज्जाव केला. आणि त्या निर्णयावर शाळा व्यवस्थापन ठाम असून येत्या जून महिन्यात त्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल, असे सांगितले असल्याचे पालक किरण उडाणे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri moshi three 10th students parents appeal cm uddhav thackeray