पीएमआरडीएची योजना; मागेल त्याला "टीपी स्कीम'

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 October 2019

टीपी स्कीमसाठी निश्‍चित केलेली हद्द 
- पिंपरी- चिंचवड व पुणे महापालिकेच्या दहा किलोमीटर हद्दीबाहेरील 
- नगरपालिकेच्या तीन किलोमीटरबाहेरील 
- एमआयडीसीच्या पाच किलोमीटरबाहेरील 
- राष्ट्रीय महामार्गापासून पाच किलोमीटर हद्दीबाहेरील 

पिंपरी -  "आता मागेल त्याला टीपी स्कीम' या तत्त्वावर जमिनींचा विकास करण्यात येणार आहे. नगररचना योजनेप्रमाणेच अत्याधुनिक लॅंड पुलिंगच्या माध्यमातून जमीनमालकांना एकत्रित येऊन भागीदारी करून गुंतवणूक करण्याची संधी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) दिली आहे. त्याअंतर्गत जवळपास 32 प्रकारे गुंतवणूक करता येणार असून, औद्योगिक, रोबोटिक्‍स, फायनान्स अँड टेक्‍नॉलॉजी, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, करमणूक, रिसर्च, आयटीसारखे गुंतवणूकदार यात सहभागी होऊ शकणार आहे. 

यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. तर, 31 ऑक्‍टोबरपर्यंत टीपी स्कीममध्ये सहभागी होता येणार आहे. तसेच, यापूर्वी अर्ज मागविलेल्या गुंतवणूकदारांची शुक्रवारी (ता. 11) औंध कार्यालयात दुपारी तीन वाजता बैठक होणार आहे. या टीपी स्कीममधील संकल्पनेनुसार सहभागींना "झोन' बदल करूनही मिळणार आहे. गुंठाभर जमीन असलेले भूधारकही एकत्रित येऊन या स्कीममध्ये सहभागी होऊ शकतात. यासाठी कमीत कमी 40 हेक्‍टर व त्यापेक्षा जास्त जमीन लागणार आहे. वादविवाद व शासकीय वनीकरण जमिनी वगळता यात प्रत्येक जण सहभागी होऊ शकणार आहे. 

टीपी स्कीमसाठी निश्‍चित केलेली हद्द 
- पिंपरी- चिंचवड व पुणे महापालिकेच्या दहा किलोमीटर हद्दीबाहेरील 
- नगरपालिकेच्या तीन किलोमीटरबाहेरील 
- एमआयडीसीच्या पाच किलोमीटरबाहेरील 
- राष्ट्रीय महामार्गापासून पाच किलोमीटर हद्दीबाहेरील 

पीएमआरडीएकडून पायाभूत सुविधा 
या योजनेत एकत्रित अथवा संमिश्र पद्धतीने भागधारक सहभागी होऊ शकतात. जमिनींचे एकत्रीकरण करून, तसेच पुनर्रचना करून त्यांना विकास करता येईल. त्यासाठी आवश्‍यक पायाभूत सुविधा पीएमआरडीएकडून पुरविण्यात येणार आहे. यासाठी पारदर्शी पद्धतीने जमिनीचा करार करून त्या ताब्यात घेतल्या जाणार असून, सर्वसामान्यांचाही या योजनेला प्रतिसाद मिळत असल्याचे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri news PMRDA new plans