पिंपरी-निगडी मेट्रो डीपीआर मंजूर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

पिंपरी - स्वारगेट ते पिंपरी मेट्रो मार्ग पिंपरीतील महापालिका भवनापासून निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत वाढविण्यासाठीच्या सविस्तर प्रकल्प आराखड्याला (डीपीआर) महापालिकेच्या स्थायी समितीने मंगळवारी (ता. ११) मंजुरी दिली. हा अहवाल आता सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात येणार असून, राज्य सरकारतर्फे तो केंद्र सरकारकडे पाठविला जाणार आहे. महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी याचे सादरीकरण अधिकारी व पदाधिकाऱ्यांसमोर केले. 

पिंपरी - स्वारगेट ते पिंपरी मेट्रो मार्ग पिंपरीतील महापालिका भवनापासून निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत वाढविण्यासाठीच्या सविस्तर प्रकल्प आराखड्याला (डीपीआर) महापालिकेच्या स्थायी समितीने मंगळवारी (ता. ११) मंजुरी दिली. हा अहवाल आता सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात येणार असून, राज्य सरकारतर्फे तो केंद्र सरकारकडे पाठविला जाणार आहे. महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी याचे सादरीकरण अधिकारी व पदाधिकाऱ्यांसमोर केले. 

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी पुणे-मुंबई महामार्गाने मेट्रो मार्ग उभारण्याचे काम सुरू आहे. दापोडीपासून पिंपरीपर्यंतच्या मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. हाच मेट्रो मार्ग पिंपरी महापालिका भवनापासून निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत वाढविण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी महामेट्रोने सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करून महापालिकेला सादर केला आहे. त्याची शिफारस सर्वसाधारण सभेकडे करण्यासाठी स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. 

तीन स्थानके उभारणार
पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गावर तीन स्थानके उभारण्यात येणार आहेत. ती निगडीतील भक्ती-शक्ती चौक, आकुर्डीतील खंडोबा माळ चौक आणि चिंचवड स्टेशन येथे पिंपरी पोलिस ठाण्यासमोर असतील, अशी माहिती महामेट्रोचे कार्यकारी अभियंता रामनाथ यांनी दिली. भक्ती-शक्‍ती चौकापासून ते दापोडीपर्यंतच्या मेट्रो मार्गाचे त्यांनी सादरीकरण केले. ते म्हणाले, ‘‘पिंपरी-निगडी मेट्रोसाठी केंद्र व राज्य सरकारकडून सुमारे तीनशे कोटी रुपये मिळणार आहेत. महापालिकेला १४७ कोटी रुपये निधी द्यावा लागणार आहे. निगडी येथून पिंपरीपर्यंत मेट्रोचा मार्ग मुंबई-पुणे महामार्गाच्या डाव्या बाजूने असेल. पिंपरीपासून दापोडीपर्यंतच्या मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे.’’ 

पुणे-पिंपरी-चिंचवड मेट्रो
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो प्रकल्प राबविला जात आहे. त्याला ‘पुणे मेट्रो’ नावाने संबोधले जात आहे. त्यास स्थायी समिती सदस्यांनी आक्षेप घेतला. पुणे मेट्रोऐवजी या प्रकल्पाचा नामोल्लेख ‘पुणे- पिंपरी- चिंचवड मेट्रो’ असा करावा, अशी सूचना त्यांनी रामनाथ यांना केली. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. 

झाडांचे पुनर्रोपण करणार
या मेट्रो मार्गामुळे बाधित होणाऱ्या झाडांचे महापालिका सुचवेल त्या ठिकाणी पुनर्रोपण केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाची मदत घेतली जाणार आहे. त्याबाबत रामनाथ म्हणाले, ‘‘मेट्रो मार्गात अडथळा ठरणाऱ्या झाडांचे पुनर्रोपण केले जाईल. या एका झाडासोबत चार नवीन झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. आतापर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात आठ हजार झाडे लावली आहेत.’’

शिवाजीनगर-हिंजवडीला मंजुरी
पुण्यातील शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गालाही केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गाच्या मुळा नदीवरील पुलापासून वाकड गावाच्या हद्दीतून हिंजवडीकडे मेट्रो जाणार आहे. महापालिका हद्दीतून जाणाऱ्या या मेट्रो मार्गासही स्थायी समितीने मंजुरी दिली.

Web Title: Pimpri Nigdi Metro DPR Sanction