
भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इच्छुकांनी बंडखोरीचा पवित्रा घेतल्याने पिंपरी मतदारसंघातील बहुरंगी लढत मोठ्या चुरशीची ठरणार आहे.
पुणे : भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इच्छुकांनी बंडखोरीचा पवित्रा घेतल्याने पिंपरी मतदारसंघातील बहुरंगी लढत मोठ्या चुरशीची ठरणार आहे. युतीत शिवसेनेचे आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार यांच्यासमोर भाजपचे अमित गोरखे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून आव्हान उभे केले आहे. तर, राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर यांच्याविरुद्ध बंडखोरी करण्याचे पक्षाचे माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी ठरविले आहे. रिपब्लिकन पक्षाचीही मतदारसंघात ताकद असल्याने वंचित बहुजन आघाडीलाही चांगले मतदान होईल.
युतीमध्ये गेल्या निवडणुकीत पिंपरी मतदारसंघ भाजपने रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांना दिला होता. त्यावेळी, झालेल्या चुरशीच्या लढतीत दोन हजार मतांच्या अधिक्याने शिवसेनेचे चाबूकस्वार विजयी झाले. बनसोडे व रिपब्लिकन पक्षाच्या चंद्रकांता सोनकांबळे यांनाही त्यांच्यापाठोपाठ चांगली मते मिळाली होती. रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी पिंपरी व पुणे कॅंन्टोन्मेंट मतदारसंघांची मागणी केली होती. मात्र, शिवसेना व भाजपचे विद्यमान आमदार असल्याने, दोन्ही मतदारसंघ युतीच्या जागा वाटपात रिपब्लिकन पक्षाच्या वाट्याला आले नाहीत. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते यावेळी आक्रमक पवित्र्यात आहेत. त्याचा फायदा वंचित बहुजन आघाडीला होण्याची शक्यता आहे.
भाजप प्रवेशानंतर नीतेश राणे म्हणाले....
शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यामुळे चाबुकस्वार 2014 च्या निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसमधून शिवसेनेत गेले होते. लोकसभेच्या निवडणुकीत बारणे यांना पिंपरीत चांगले मताधिक्य मिळाले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनीही निवडणुकीची जोरदार तयारी केली होती. गोरखे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार अण्णा बनसोडे गेल्या दोन निवडणुकीत रिंगणात होते. यावेळी पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने तेही बंडखोरीच्या तयारीत आहेत.