व्यसनाच्या जाळ्यात तरूणाई; पोलिस यंत्रणा सुस्त

सागर शेलार
सोमवार, 15 जानेवारी 2018

पिंपरी - तरुणांमधील व्यसनांचे वाढते प्रमाण हे फॅशन म्हणून अधिक आहे. दारू, सिगारेट, हुक्का, ड्रग्ज, तंबाखू, गुटखा यांचे प्रमाण चिंताजनक आहे. पिंपरी-चिंचवड व पुण्यातही याचे प्रमाण वाढत आहे. यासाठी सरकार, सामाजिक संस्था, प्रशासन व आपण सर्वांनी सामाजिक भान राखून हे वेळीच सावरायला हवे.

पिंपरी - तरुणांमधील व्यसनांचे वाढते प्रमाण हे फॅशन म्हणून अधिक आहे. दारू, सिगारेट, हुक्का, ड्रग्ज, तंबाखू, गुटखा यांचे प्रमाण चिंताजनक आहे. पिंपरी-चिंचवड व पुण्यातही याचे प्रमाण वाढत आहे. यासाठी सरकार, सामाजिक संस्था, प्रशासन व आपण सर्वांनी सामाजिक भान राखून हे वेळीच सावरायला हवे.

मुंबईच्या घटनेनंतर प्रशासनाला जाग येणार का?
मुंबईत पबला लागलेल्या आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. आग लागलेल्या पबचे बांधकाम अनधिकृत असल्याचे समोर येत आहे. पालिकेने त्या ठिकाणी घटना झाल्यानंतर कारवाई केली. तसेच त्या पबमध्ये हुक्‍क्‍यासह इतर प्रकारही सुरू असल्याचे बोलले जात आहे. अशा स्वरूपाच्या दुर्घटना शहरातही घडू शकतात; कारण अनेक अवैध पब शहरात चालू असल्याचे पोलिस खाते खासगीत सांगते. त्यामुळे पोलिस व महापालिका प्रशासनाने वेळीच जागे होण्याची गरज आहे. 

शहरातील नाइट क्‍लब, पब सुरूच
तरुण-तरुणींचे आकर्षण असलेल्या शहरातील नाइट क्‍लब, पब किंवा डिस्को यांना पुणे पोलिसांनी कोणत्याही प्रकारची परवानगी किंवा नाहरकत प्रमाणपत्र दिले नाही. तसेच त्यांची कोणतीच माहिती पोलिसांकडे नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कायद्यान्वये पुणे पोलिसांनी दिलेल्या उत्तरात नाइट क्‍लब, पब व डिस्को यांची कोणतीच माहिती पोलिसांकडे नाही. तसेच नाइट क्‍लब, पब व डिस्को यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही. असे सहायक पोलिस आयुक्त तथा जनमाहिती अधिकारी वैशाली जाधव-माने यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. नाइट क्‍लब, पब, किंवा डिस्को यांच्यात मोठ्या प्रमाणात गैरकृत्य तसेच अवैध धंदे चालतात. मात्र याबाबत पोलिसांना माहिती नसणे म्हणजेच विकृतीला खतपाणी मिळत असल्याचे नागरिक म्हणताहेत.

हुक्‍क्‍याचे व्यसन 
पिंपरीत हुक्‍क्‍याची सिसा, हब्बल-बब्बल, हुक्कापेन आदी नावाने विक्री होते. शहरात साध्या टपरीवरही हुक्का मिळतो आहे. हुक्‍क्‍याची क्रेझ युवा पिढीसह महिलांतही मोठ्या प्रमाणावर दिसते. शहरातील प्रख्यात वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालयातही तरुण-तरुणी हे व्यसन मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहेत. 

पिंपरी-चिंचवडमधील संस्कार सोशल फाउंडेशनच्या माहितीनुसार, शहरात हुक्का पार्लर व अंमली पदार्थ सेवनाचे प्रमाण वाढत असून, अनेक अल्पवयीन मुलेही हुक्का, ड्रग्जच्या आहारी जात आहेत. शहरातील एका प्रख्यात महाविद्यालयातील वसतिगृहात बारावीनंतरच्या ६० ते ७० टक्के मुलांना विविध व्यसने असल्याचे समोर आले आहे. मात्र सध्या १२ ते १३ वर्षांनंतरच्या अनेक महाविद्यालयीन व शाळकरी मुलांमध्ये विविध व्यसनांचे प्रमाण वाढत आहे, असे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बाळकृष्ण खंडागळे यांनी सांगितले. 

शाळेतही हुक्का पार्टी
निगडी येथील एका खासगी शाळेत सहामाही परीक्षा संपल्यानंतर मुलांनी हुक्का साहित्य आणून परीक्षा कक्षातच हुक्का पार्टी केली. वर्गातून धूर येत असल्याचे सीसीटीव्हीत पाहिले असता, हुक्का पार्टीचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर शाळेने या विद्यार्थ्यांवर कारवाई केली. यातील एक मुलगा नगरसेवकाचा भाचा होता. पालकांनादेखील आपली मुले काय करत आहेत हे माहीत नसणे खूप धोकादायक आहे.  

हुक्‍क्‍याचे पिंपरीतील हॉटस्पॉट
हिंजवडी, आकुर्डी, रावेत, वाकड, पिंपळे सौदागर, सांगवी, निगडी, भोसरी, रहाटणी, पिंपरी, चिंचवड.   

पुण्यातील हॉटस्पॉट
कोंढवा, कोरेगाव पार्क, मुंढवा, कर्वे रस्ता, बाणेर, औंध रस्ता, फर्ग्युसन रस्ता, स्टेशन परिसर, हडपसर, भांडारकर रस्ता, सेनापती बापट रस्ता, कॅम्प परिसर.

शहरात हुक्‍क्‍याचे ५२ फ्लेवर 
स्वीट अँड कॅंडी फ्लेवर, स्वीट लाइम, सिल्वर फॉक्‍स, कोला, बॉम्बे पान मसाला, चॉकलेट, वेनिला, पायनापल, स्ट्रॉबेरी आदी फ्लेवर पुणे व पिंपरीत उपलब्ध.

साहित्याची किंमत ३०००-४६००० 
फ्लेवरची किंमत ३००-६०००

व्यसनांबाबत सरकारचे धोरण
व्यसन रोखण्याच्या बाबतीत केंद्र व राज्य सरकार उदासीन असल्याचे दिसते. २००२ मध्ये देशातील ४० हजार नागरिकांमध्ये व्यसनाबाबत सर्वेक्षण झाले होते. त्यानंतर चार महिन्यांपूर्वी विविध सामाजिक संस्थांच्या २०१२ पासूनच्या आग्रहानंतर देशातील व्यसनांबाबतचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. हे सर्वेक्षण जेव्हा पूर्ण होईल तेव्हा खरी आकडेवारी समजू शकेल. 
तंबाखूजन्य कायदा काय म्हणतो

(सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम २००३) नुसार विडी, सिगारेट, सिगार, चिरूट, हुक्का, गुटखा, तपकीर, हिरड्यांना लावण्याची मिसरी तसेच तंबाखूच्या सर्व प्रकारच्या पदार्थांचे सेवन ज्या ठिकाणी ३० लोकांना एकदाच बसण्याची सुविधा किंवा ३० रूमची सुविधा असेल, अशा हॉटेलमध्ये उपलब्ध करून देण्याची मुभा; मात्र या कायद्यातील नियमानुसार स्वतंत्र स्मोकिंग झोन असणे बंधनकारक आहे. शैक्षणिक संस्थांपासून शंभर मीटरच्या आत अशा पदार्थांची विक्री करता येत नाही. १८ वर्षांखालील मुलांना विक्री करण्यास बंदी आहे; परंतु यातील कुठल्याच बाबींचे पालन होत नाही. एका बाजूला राज्य सरकारने तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी घातली आहे, तर केंद्र सरकारने याला संमती दिली आहे. हा कसला दुटप्पी न्याय, असा सवाल जनता करत आहे. 

कायदा कुचकामी..
या कायद्यानुसार मानवास हानिकारक असलेल्या पदार्थांची विक्री करणाऱ्यास फक्त दोनशे रुपये दंड आहे. सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम हा कायदा सर्व कायद्यांमध्ये कुचकामी असल्याचे तज्ज्ञ म्हणतात. कायद्यात अदखलपात्र कलमे आहेत. त्यामुळे तो कुचकामी ठरतो.

दुरुस्तीसाठी प्रस्ताव 
नोव्हेंबरमध्ये पुणे पोलिसांनी २००३ च्या कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव पोलिस महासंचालक कार्यालयाला पाठवला आहे. याबाबत एवढ्या उशिरा जाग आल्यामुळे चौदा वर्षे पोलिस काय झोपले होते का, असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.

कारवाईचे अधिकार कोणाला 
१) प्राचार्य, मुख्याध्यापक, शैक्षणिक संस्थेचा प्रमुख 
२) सहायक कामगार आयुक्त, कामगार विभाग
३) उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी, अन्न व औषध प्रशासन
४) निरीक्षक दर्जाचे अधिकारी, शिक्षण विभाग
५) उपनिरीक्षक व त्यावरील अधिकारी, पोलिस खाते  
६) महापालिका आरोग्य अधिकारी
७) सरपंच व ग्रामसेवक
८) जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा आरोग्य विभाग
९) मुख्य वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय 
१०) गटविकास अधिकारी 
११) संचालक, सहायक संचालक, आरोग्य विभाग 
१२) नोडल अधिकारी, जिल्हा तंबाखू नियंत्रण पथक
या विभागांना कारवाईचे अधिकार असल्याचे सर्वसामान्यांना तर माहीत नाहीच; परंतु या विभागांनादेखील माहीत आहे की नाही, असा प्रश्‍न पडतो.

धूम्रपान व तंबाखूचे दुष्परिणाम
कर्करोगाची शक्‍यता  
पुरुषांमध्ये नपुंसकता येण्याचा धोका
स्त्रियांमध्ये इस्ट्रोजनची पातळी कमी करते
शारीरिक कमकुवतपणा येतो 
सहनशीलता ढासळते
गर्भपाताची शक्‍यता
विविध श्‍वसनाच्या आजारांना आमंत्रण

कारणे
अशा उत्पादनांची सहज उपलब्धता
लोप पावत असलेली एकत्र कुटुंबपद्धती
पालक व पाल्यांमध्ये संवादाचा अभाव
पार्टी संस्कृतीचा वाढता प्रभाव
चित्रपट, मालिका यामधील व्यसनांचे उदात्तीकरण 
समाजात मिळणारी प्रतिष्ठा
शासकीय यंत्रणांची कुचराई; जनजागृतीचा अभाव

पुणे व पिंपरीत ड्रग्जचे जाळे 
अँटी नार्को सेलच्या माहितीनुसार, गेल्या ५ वर्षांत पुण्यासह पिंपरीमध्येही ड्रग्जचे जाळे मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. शहरातील तरुणाईमध्ये ड्रग्ज घेण्याचे प्रमाण वाढते आहे. गांजा तर शहरातील साध्या टपरीवरदेखील उपलब्ध होत आहे. यामुळे तरुणाई व्यसनांना बळी पडते आहे. हा धोका खूप मोठा आहे. तो वेळीच ओळखून प्रशासनाने त्याला त्वरित पायबंद घालावा. सध्या पुणे व पिंपरीत ब्राउन शुगरची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. ड्रग्जची ९५ टक्के विक्री करणारे ड्रग्जचे व्यसनी असतात, असेही ते म्हणतात. पुणे व पिंपरीत गांज्याची पावसाळ्यात व हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात विक्री होते.

238 ड्रग्जचे प्रकार
निसर्गनिर्मित - गांजा, चरस, अफू बाकी सर्व ड्रग्ज केमिकल प्रक्रियेने तयार होतात.

ड्रग्जचे प्रकार    प्रमाण/ किंमत रुपये    कोठून येते
हेरॉइन    १ ग्रॅम २० हजार      नायजेरिया- मुंबई- पुणे
कोकेन    १ ग्रॅम २० हजार      नायजेरिया- मुंबई- पुणे
ब्राउन शुगर    १ ग्रॅम ३ हजार        राजस्थान- मध्य प्रदेश सीमेवरील भवानगड
मेफेड्रोन/एमडी    १ ग्रॅम २ हजार    गुजरात -मुंबई -पुणे
चावमॅव
चरस    १ किलो दीड लाख    नेपाळ हिमाचल प्रदेश मुंबई पुणे
अफू    १ किलो १५ हजार    दक्षिण भारत, राजस्थान
गांजा    १ किलो १५ हजार    विदर्भ, उत्तर भारत

ड्रग्जचे दुष्परिणाम
मानसिक व शारीरिक संतुलन बिघडते
हृदयविकाराचा धोका
शारीरिक पेशींना हानी पोचण्याची शक्‍यता
स्मृती नष्ट होण्याचा धोका
नपुंसकत्व येण्याची शक्‍यता
गुन्हेगारी मानसिकता होते
हेरॉइन किंवा कोकेन दोन ग्रॅमपेक्षा जास्त घेतल्यास जागीच मृत्यू होण्याचा धोका

अमली पदार्थ कायदा काय म्हणतो 
1 केंद्र सरकारच्या नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॅफिक सब्स्टेंसेस ॲक्‍ट १९८५ नुसार, ड्रग्जची विक्री करताना कोणी सापडल्यास त्याला कमीत-कमी दहा वर्षांची शिक्षा आहे. व्यसन करणाऱ्याला एक वर्षाची शिक्षा आहे. ड्रग्जबाबतच्या कारवाईचे अधिकार राज्य पोलिस अमली पदार्थविरोधी पथक,
2 केंद्रीय सीमा शुल्क व उत्पादन शुल्क, राज्य उत्पादन शुल्क, महसूल खाते, ड्रग्ज कंट्रोल व सीमा सुरक्षा दल यांना आहेत. हा कायदा तंबाखूजन्य पदार्थ कायद्याच्या तुलनेत चांगला असल्याचे तज्ज्ञ म्हणतात.

तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया...
केंद्र सरकारने २००२ मध्ये व्यसनांबाबत सर्व्हे केला होता; मात्र त्या सर्व्हेमध्ये खरी वस्तुस्थिती समोर आली नाही. तरुणांमध्ये व्यसनाधीनता दिवसेंदिवस वाढत आहे. तरुणांचा देश असलेल्या भारतासाठी ही धोक्‍याची घंटा आहे. यासाठी समाजात जनजागृतीची आवश्‍यकता आहे.
- संजय भगत, सहायक पश्‍चिम क्षेत्र, सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

सिगारेट व हुक्का पिण्यामध्ये मुलींचे प्रमाण वाढत आहे. दारू सोशल ड्रिंक, सिगारेट, गांजा फॅशन म्हणून पिला जातो. एखाद्या ग्रुपमध्ये कोण व्यसन
करत नसेल तर त्याला इतर प्रवृत्त करतात. व्यसनाच्या दुष्परिणामांबाबत पोलिस विभागाकडून सतत तरुणाईचे समुपदेशन केले जाते आहे.
- सुनील दोरगे, निरीक्षक, अमली पदार्थविरोधी पथक, गुन्हे शाखा पुणे 

कमी वयात जास्त पैसे मिळत असल्यामुळे तसेच धकाधकीच्या जीवनात ताण घालवण्यासाठी व मौजमजेसाठी तरुणाई व्यसन करते. त्यामुळे तरुणाईचे भविष्य धोक्‍यात आले आहे. शक्‍यतो मद्यपान टाळावे. व्यसन असल्यास ते नियंत्रित असावे.
- मोहन वर्दे, अधीक्षक, पुणे जिल्हा, राज्य उत्पादन शुल्क.

आत्तापासून व्यसनांवर नियंत्रण ठेवले गेले नाही, तर युवकांचा देश म्हणून गणलेला भारत पुढील काळात कार्यक्षम व महासत्ता बनण्यात अपयशी होईल. व्यसनांमुळे मानसिक आजाराची शक्‍यता आहे. व्यसनांबाबत समाजात जनजागृतीची गरज आहे. तसेच अशा उत्पादनांची उपलब्धता कमी करणे गरजेचे आहे.
- डॉ. सदाशिव गाडेकर, मानसोपचारतज्ज्ञ 

सरकारने व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या संस्था वाढविण्याची गरज आहे. आज अल्पवयीन मुलांत मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत असून, त्याचे मुख्य कारण त्यांच्यातील व्यसन हे आहे. अनेक गुन्हेगार कमी वयाच्या मुलांना व्यसनासाठी पैसे देऊन मोठ-मोठे गुन्हे करवून घेतात. सध्या बाल न्यायमंडळासमोर एक हजार ९०० प्रकरणे प्रलंबित आहेत. 
- अश्‍विनी रसाळ, सामाजिक कार्यकर्त्या, रिसोर्स सेल फॉर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri pune news drugs nest in pimpri & pune