शहरातील कचरा समस्या जटिल

दीपेश सुराणा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

पिंपरी - शहराचे वाढते नागरीकरण, लोकसंख्या वाढ यामुळे कचरा निर्मितीचे प्रमाण वाढले आहे. तुलनेत दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे ओला आणि सुका कचरा अलगीकरण योग्य पद्धतीने होत नसल्याचे चित्र आहे. पुरेशा साधनसामग्रीचा अभाव, मनुष्यबळाची कमतरता यामुळे शहरातील सर्व भागात नियमित कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पर्यायाने शहरातील कचरा समस्या जटिल बनत चालली आहे.

पिंपरी - शहराचे वाढते नागरीकरण, लोकसंख्या वाढ यामुळे कचरा निर्मितीचे प्रमाण वाढले आहे. तुलनेत दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे ओला आणि सुका कचरा अलगीकरण योग्य पद्धतीने होत नसल्याचे चित्र आहे. पुरेशा साधनसामग्रीचा अभाव, मनुष्यबळाची कमतरता यामुळे शहरातील सर्व भागात नियमित कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पर्यायाने शहरातील कचरा समस्या जटिल बनत चालली आहे.

शहराची लोकसंख्या सध्या वीस लाखांवर जाऊन पोचली आहे. दररोज ८०० ते ८५० टन कचरा निर्माण होतो. इतक्‍या मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे सुयोग्य व्यवस्थापन करण्याचे महापालिका प्रशासनासमोर कायमचे आव्हान राहिले आहे. दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण विविध कारणांमुळे कमी-जास्त होत असते. कचऱ्यावर मोशी कचरा डेपोतील ८१ एकर क्षेत्रात प्रक्रिया केली जाते. शहरात दररोज नियमित कचरा उचलला जात नसल्याने सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी ओरड केली होती. त्यानंतरही ही समस्या सुटलेली नाही. 

कोट्यवधी रुपयांचा खर्च
बांधकामातून निर्माण होणारा राडारोडा, कचरा आदींवर प्रक्रिया आणि व्यवस्थापन करण्यासाठी महापालिका प्रशासनाने नुकत्याच निविदा मागविल्या आहेत. ‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ तत्त्वावर हा प्रकल्प राबवायचा आहे. संबंधित प्रकल्पाच्या विकासासाठी महापालिका दहा कोटी रुपयांचे भांडवली अनुदान देणार आहे. त्याशिवाय मोशीतील प्रस्तावित कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पासाठीही महापालिकेने निविदा कार्यवाही सुरू केली आहे. दोन नोव्हेंबरला त्याच्या तांत्रिक निविदा उघडल्या जाणार आहेत. संबंधित प्रकल्पातील आवश्‍यक सुविधांच्या उभारणीसाठी महापालिका कंत्राटदाराला आर्थिक मदत म्हणून ५० कोटी रुपयांचा निधी देणार आहे. 

मोशी कचरा डेपोत होणारी प्रक्रिया 
यंत्रणा                               चालू असलेली प्रक्रिया (टन दररोज)
यांत्रिकी खत प्रक्रिया          सुमारे ४३५ मेट्रिक टन
गांडूळ खत                     १२ ते १५ टन भाजी मंडईमधील कचरा
                                         १५ ते १८ टन मलनिस्सारण केंद्रातील स्लज
प्लॅस्टिकपासून इंधन          १.५ ते २ टन
कॅपिंग (जमीन भरणा क्षेत्र)  ४ लाख घनमीटर घनकचरा

घनकचऱ्याचे प्रकार
ओला कचरा : पालापाचोळा, भाजीपाल्याचा उरलेला अंश, स्वयंपाकातील टाकलेले पदार्थ, जनावरांची विष्ठा.
सुका कचरा : प्लॅस्टिक (बाटल्या, पॅकिंग साहित्य, पिशव्या), कागद, काच, कापड, लोखंड, रबर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri pune news garbage problem major