वृत्ती बदलायला हवी

शिवाजी आतकरी
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

निगडी - एका बाजूला शहराची गौरवशाली ऐतिहासिक वाटचाल आणि दुसरीकडे अशांत वर्तमान काळ अशी स्थिती सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये निर्माण झाली आहे. सामाजिक स्वास्थ्य विविधांगांनी बिघडत आहे. त्याच्या अनेक कारणांपैकी एक म्हणजे मानसिकता बिघडविणारे ‘हॉर्न’ वाजविण्याची विकृती. दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांचे सतत, विनाकारण आणि वरच्या पट्टीत वाजणारे चित्रविचित्र ‘हॉर्न’ असंस्कृतपणाचे दर्शन घडवितात. ध्वनिप्रदूषणाकडे दुर्लक्ष करून ‘हॉर्न’ वाजवत वेडीवाकडी वाहने चालविली जातात, ही वृत्ती बदलायला हवी.

निगडी - एका बाजूला शहराची गौरवशाली ऐतिहासिक वाटचाल आणि दुसरीकडे अशांत वर्तमान काळ अशी स्थिती सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये निर्माण झाली आहे. सामाजिक स्वास्थ्य विविधांगांनी बिघडत आहे. त्याच्या अनेक कारणांपैकी एक म्हणजे मानसिकता बिघडविणारे ‘हॉर्न’ वाजविण्याची विकृती. दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांचे सतत, विनाकारण आणि वरच्या पट्टीत वाजणारे चित्रविचित्र ‘हॉर्न’ असंस्कृतपणाचे दर्शन घडवितात. ध्वनिप्रदूषणाकडे दुर्लक्ष करून ‘हॉर्न’ वाजवत वेडीवाकडी वाहने चालविली जातात, ही वृत्ती बदलायला हवी.

काही वाद, काही विवाद
आपण विनाकारण ‘हॉर्न’ वाजवतो, त्याचा दुसऱ्यास त्रास होतो, याचा अजिबात विचार होत नाही. दुसऱ्या कुणी ‘हॉर्न’ वाजवला तर रस्त्यावरच दोन हात करण्याची प्रवृत्ती अनेकदा दिसते. ‘हॉर्न’ वाजवला म्हणून एका मोठ्या हॉस्पिटलच्या डॉक्‍टरांना भर रस्त्यात बेदम मारहाण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी चिंचवडमध्ये घडली. 

तरुणाई आघाडीवर 
आवश्‍यकता नसताना ‘हॉर्न’ वाजवत बेजबाबदारपणाचा कळस करणाऱ्यांमध्ये तरुणाई आघाडीवर आहे. ‘हॉर्न’चे विविध प्रकार ऐकण्यास मिळतात. या बेदरकार वृत्तीला पायबंद घालण्यासाठी कायद्यापेक्षा स्वयंशिस्त हाच एक उपाय आहे. त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.

परदेशात क्वचित ‘हॉर्न’ वाजवले जातात. जबाबदार वाहनचालक अनावश्‍यक ‘हॉर्न’ वाजवीत नाहीत. आपल्याकडचे चित्र उलटे आहे. क्रेझ म्हणून चित्रविचित्र ‘हॉर्न’ वाजवणारे बेजबाबदार वाहनचालक पावलोपावली आहेत. नियमांपेक्षा सामाजिक जाणीव ठेवून, ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरू नये याची काळजी प्रत्येकाने घेणे आवश्‍यक आहे. पोलिसांना कारवाई करावी लागावी, हेच मुळी चुकीचे आहे. हॉस्पिटल, कोर्ट, सरकारी कार्यालये, शाळा वगैरे ठिकाणी ‘हॉर्न’ वाजवूच नये, असा नियम आहे. ‘नो हॉर्न झोन’ असतानाही ‘हॉर्न’ वाजवले जातात. अशा ‘हॉर्न’ वाजविणाऱ्यांविरुद्ध पोलिस कारवाई करतात. मात्र, वाहनचालकांमध्ये स्वयंशिस्त असावी.
- राजेंद्र भामरे, सहायक आयुक्त, वाहतूक विभाग

वाहनांच्या ‘हॉर्न’मुळे होणारे प्रदूषण मोठे आहे. अशा वाहनचालकांवर कारवाई करण्याचे काम पोलिसांचे आहे. जनरेटर, इंडस्ट्रीज, डीजे वगैरे ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ कारवाई करते.
- डी. जे. साळुंखे, प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ

‘हॉर्न’ वाजविण्याची शक्‍यतो गरजच नसते. मात्र, विचित्र मानसिकतेचे वाहनचालक सातत्याने ‘हॉर्न’ वाजवतात व प्रचंड ध्वनिप्रदूषण करतात. ‘मॉडिफाइड हॉर्न’ वाहनांना बसवू नयेत. ध्वनी प्रदूषणाचे गंभीर परिणाम होतात हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे. आमच्या कार्यालयाकडून कारवाई केली जाते, पण त्यास मर्यादा येतात.
- आनंद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

कर्कश आवाज करणारे ‘हॉर्न’ वाजविणे आणि ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येते. निकषानुसार असणारे ‘हॉर्न’ आवश्‍यक असल्यासच वाजवणे अपेक्षित आहे. मात्र, वेगवेगळे ‘हॉर्न’ बसवून ते रस्त्यावर वाजवून ध्वनी प्रदूषण करणे, इतर वाहनचालकांना, पादचाऱ्यांना भीती निर्माण होईल असे ‘हॉर्न’ वाजवणे हा गुन्हा आहे, अशा वाहनांवर कारवाई केली जाते. 
- किशोर म्हसवडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

Web Title: pimpri pune news horn sound pollution