
निगडीपर्यंत मेट्रोची १२ ऑगस्टला घोषणा?
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे उंचावल्या अपेक्षा; पोलिस आयुक्तालयही जिव्हाळ्याचा इशारा
पिंपरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १२ ऑगस्टला शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्या वेळी येथील अनेक प्रश्नांवर सविस्तर ऊहापोह होण्याची शक्यता असून, अनेक प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय आणि निगडीपर्यंत मेट्रो प्रकल्पाची उभारणी पहिल्या टप्प्यातच करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांकडून घोषणा होणे अपेक्षित आहे.
महापालिकेच्या निवडणुकीनंतर मे महिन्यात झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री शहरात आले होते. त्या वेळी शहरातील प्रश्नांबाबत ऊहापोह झाला नव्हता. मात्र, महापालिकेत परिवर्तन होऊन भाजपच्या हाती सत्ता आलेली होती. आता पक्षाचे पदाधिकारी सत्तेवर स्थिरावत आहेत. त्यामुळे तब्बल चार महिन्यांच्या अवधीनंतर पहिल्यांदाच महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन असे कार्यक्रम होणार आहेत.
शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे स्वतंत्र पोलिस आयुक्तालय आणि पहिल्या टप्प्यातच निगडीपर्यंत मेट्रो याविषयी मुख्यमंत्र्यांनी घोषणा करावी, यासाठी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे आणि अन्य पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. याबाबत मुख्यमंत्रीही अनुकूल आहेत. या दौऱ्यात ते घोषणा करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
उद्घाटने आणि भूमिपूजने
भोसरी एमआयडीसी व दिघी पोलिस ठाण्यांच्या इमारतींचे उद्घाटन
निगडीतील भक्ती-शक्ती चौकातील नियोजित उड्डाण पूल व ग्रेडसेपरेटरचे भूमिपूजन
साई चौक-जगताप डेअरी येथील ग्रेडसेपरेटरचे भूमिपूजन
अन्य लहानमोठ्या प्रकल्पांचे भूमिपूजन व उद्घाटन ऑनलाइन करण्याचा महापालिकेचा प्रयत्न
Web Title: Pimpri Pune News Metro Announcing 12th August
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..