पोलिसांची सायकलवरून गस्त

वैशाली भुते
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

सायकलींवरून गस्त घालण्याचा उपक्रम अतिशय आनंददायी होता. येथीलच सायकल व्यावसायिकाने पोलिसांना एक सायकल उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्यासारख्याच आणखी काही नागरिकांकडून आम्हाला सायकली मिळणार आहेत. त्यानंतर या परिसरातील पोलिसही सायकलींवरून गस्त घालताना नागरिकांना पाहायला मिळतील. 
- किशोर म्हसवडे, पोलिस निरीक्षक, सांगवी वाहतूक विभाग 

पिंपरी - विकासाच्या अफाट वेगामुळे स्मार्ट सिटी अभियानात (एरिया बेस डेव्हलपमेंट) समावेश झालेल्या पिंपळे सौदागर परिसरातील वाहतूक पोलिसही ‘स्मार्ट’ झाले आहेत. वाहतूक नियोजन आणि नियमनाच्या विविध ‘स्मार्ट’ कल्पना अमलात आणण्यास सुरवात केली आहे. नागरिकांना पर्यावरण संरक्षण, निरोगी आरोग्यासाठी सायकलींचे महत्त्व पटवून देण्यासाठी येथील पोलिस अधिकाऱ्यांनी चक्क सायकल हाती घेतली आहे. 

वाहनचालकांना सायकल चालविण्यासाठी प्रेरित करणे, त्यातून स्थानिक पातळीवरील वाहतूक समस्या सोडविणे, हादेखील त्यामागचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांना सायकल चालविण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ‘झूमकार’ या खासगी कंपनीने सार्वजनिक स्तरावर सायकलींचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत कंपनीने पिंपळे सौदागरमध्ये दहा ते बारा केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रांवरून सबंध परिसरामध्ये दीडशे ते दोनशे सायकली उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याला स्थानिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रतिअर्धातास एक रुपया याप्रमाणे भाडेतत्त्वावर (ऑनलाइन) मिळणाऱ्या या सायकली आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या आहेत. 

या सर्वांत वाहतूक पोलिस तरी मागे कसे राहातील? त्यातूनच मग सांगवी वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनीही प्रायोगिक तत्त्वावर सायकलींवरून गस्त घालण्याचा निर्णय घेतला. पोलिस व्हॅनला ‘लाल कंदिल’ दाखवत वैयक्तिक स्तरावर सायकली हाती घेतल्या. सलग दोन-तीन दिवस त्यांनी सायकलींवरून परिसराचा फेरफटका मारला. पोलिसांना सायकलींवरून गस्त घालताना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या; मात्र पोलिसांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर सर्वांनीच त्यांचे कौतुकही केले. 

किशोर म्हसवडे म्हणाले, ‘‘पिंपळे सौदागर, गुरव हा उच्चभ्रू परिसर असल्याने येथील वाहनांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे रस्त्याचा विकास झाला असला, तरी ते अपुरे पडत आहेत. परिणामी, वाहतूक कोंडीच्या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. शिवार चौक, गोविंद चौक, कोकणे चौक वाहतुकीच्या समस्येत अडकले आहेत. एवढेच नव्हे, तर वाहतुकीच्या नियमांचा मोठ्या प्रमाणावर भंग होत आहे. वाहनांचा कमीत कमी वापर हा त्यावरील एकमेव तोडगा आहे. अनेकदा या वाहतुकीमुळे पोलिसांच्या गस्तीत अडथळा निर्माण होतो. नाइलाजास्तव शॉर्टकट शोधताना नागरिकांना नियमभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागते; मात्र सायकलीचा उपक्रम राबविल्यास नियमांचे पालन करत ड्युटी करणे आम्हाला सोपे जाईल, तसेच नागरिकांनाही पोलिसी कारवाई टाळता येईल. त्यामुळे सायकलींबाबत जनजागृती होणे आवश्‍यक असल्याने आम्ही सायकली हाती घेतल्या. त्यातून आम्ही अप्रत्यक्षरीत्या पर्यावरण रक्षणाचेही महत्त्व पटवून देत असून, निरोगी आरोग्याचाही संदेश देत आहोत.’’

Web Title: pimpri pune news police patrol on cycle