मुळशीत विक्रमी भाडेकरार

वैशाली भुते
गुरुवार, 18 जानेवारी 2018

पिंपरी - फ्लॅट किंवा दुकानाचे भाडेकरार ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्याच्या सुविधेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, मागील वर्षांत (जानेवारी ते डिसेंबर २०१७) मुळशी दुय्यम निबंधक कार्यालयातून तब्बल साडेआठ हजार करारनाम्यांची नोंदणी झाली. मुळशी तालुक्‍यातील ही आतापर्यंतची विक्रमी नोंदणी असून, सुशिक्षित नागरिक विशेषत: आयटीयन्स या नोंदणीला विशेष प्राधान्य देत असल्याचे त्यावरून स्पष्ट झाले आहे. त्यातून शासनाच्या तिजोरीत सुमारे ५० लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. 

पिंपरी - फ्लॅट किंवा दुकानाचे भाडेकरार ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्याच्या सुविधेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, मागील वर्षांत (जानेवारी ते डिसेंबर २०१७) मुळशी दुय्यम निबंधक कार्यालयातून तब्बल साडेआठ हजार करारनाम्यांची नोंदणी झाली. मुळशी तालुक्‍यातील ही आतापर्यंतची विक्रमी नोंदणी असून, सुशिक्षित नागरिक विशेषत: आयटीयन्स या नोंदणीला विशेष प्राधान्य देत असल्याचे त्यावरून स्पष्ट झाले आहे. त्यातून शासनाच्या तिजोरीत सुमारे ५० लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. 

हिंजवड आयटी पार्कनंतर हिंजवडीसह मुळशी तालुक्‍यातील माण, मारुंजी, नेरे, वाकड या परिसरांचा झपाट्याने विकास झाला. विस्तीर्ण  क्षेत्रावर बहुमजली इमारती उभ्या राहिल्या. अनेक व्यावसायिक संकुले उभारली गेली. तर, अनेक गुंतवणूकदारांनीदेखील या परिसरावर लक्ष केंद्रित केले. 

गुंतवणूक आणि व्यावसायिक संकुलांच्या माध्यमातून सदनिका, व्यावसायिक गाळे भाडेतत्वाने देण्याचा नवीन व्यवसाय तेजित आला. गेल्या सात- आठ वर्षांमध्ये त्यात अधिकच भर पडत गेली. दरम्यान, २०१४ मध्ये भाडे नियंत्रक कायदा  १९९९मधील कलम (५५) दोन अन्वये लिव्ह अँड लायसेन्स करारनामा दुय्यम निबंधक कार्यालयाकडे नोंदविणे बंधनकारक करण्यात  आले. सुरवातीच्या टप्प्यात त्याला फारसा प्रतिसाद नव्हता. मात्र, दिवसातील बाराहून अधिक तास माहितीतंत्रज्ञान क्षेत्रात वावरणाऱ्या आयटीयन्सना ऑनलाईन नोंदणीचा पर्याय सोयीचा ठरल्याने त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने प्रतिसाद वाढत गेला. त्यातूनच चालू आर्थिक  वर्षांत ऑनलाईन ७ हजार १३८, तर १ हजार ४४९ ऑफलाईन नोंदणी झाल्या. 

काय सांगतो कायदा 
नोकरीच्या शोधात आलेल्या राज्य व परराज्यातील लोकसंख्येच्या लोंढ्यांना उत्पन्नाचे साधन करू पाहणाऱ्यांना सुरक्षितता मिळावी,  तसेच शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, या हेतूने भाडे नियंत्रक कायदा करण्यात आला. तर, याच कायद्याच्या कलम (५५) दोन अन्वये ‘लिव्ह अँड लायसेन्स’ करारनामा दुय्यम निबंधक कार्यालयाकडे नोंदविणे बंधनकारक करण्यात आले.

फ्लॅट भाड्याने देण्यासाठी सर्वसाधारणपणे अकरा महिन्यांचे भाडेकरार (लिव्ह अँड लायसेन्स) करण्यात येतात. हे करार करताना नागरिकांचा वेळ वाचावा आणि अधिक सुलभ पद्धतीने प्रक्रिया पार पडावी, यासाठी नोंदणी आणि मुद्रांकशुल्क विभागाने दोन महिन्यांपूर्वी भाडेकरार ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

नागरिकांनी भाडेकराराची नोंदणी करावी, यासाठी शासनाकडून पुरेशा प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन विशेषत्वाने करण्यात येत आहे. त्याला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
- पी. एस. शेलार, दुय्यम निबंधक, मुळशी

अन्यथा शिक्षेची तरतूद
१९९९ मधील कलम (५५) दोन अन्वये लिव्ह अँड लायसेन्स करारनामा दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविण्याची जबाबदारी मालकाची  आहे. अन्यथा कलम ५५ नुसार तीन महिने कारावास अथवा दंड जास्तीत जास्त पाच हजार किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.

Web Title: pimpri pune news rent agreement record in mulshi