esakal | पिंपरीत वाहनचालकांना जुन्याच दंडाची आकारणी
sakal

बोलून बातमी शोधा

Pimpri-RTO

वाहतुकीच्या नवीन नियमांच्या अंमलबजावणीबाबतचे कोणतेही पत्र आमच्या विभागाला प्राप्त झालेले नाही. आम्हाला हे पत्र प्राप्त होताच त्याची तातडीने अंमलबजावणी केली जाईल. 
- प्रसाद गोकुळे, पोलिस निरीक्षक, वाहतूक

पिंपरीत वाहनचालकांना जुन्याच दंडाची आकारणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - नवीन मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार केंद्र सरकारने नवीन नियमावलीची अंमलबजावणी १ सप्टेंबरपासून करण्यात येईल, असे जाहीर केले. मात्र, शहरात जुन्याच पद्धतीने दंड आकारणी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बेशिस्त वाहनचालकांना जास्तीचा दंड आकारून धडा शिकविण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन कायद्यात बदल केला आहे. त्यामध्ये दंडाच्या रकमेत मोठी वाढ केली आहे. वेग मर्यादेचे उल्लंघन केल्यास ४०० रुपयांऐवजी दोन हजार रुपये, धोकादायक पद्धतीने वाहन चालविणाऱ्यांना एक हजार रुपयांऐवजी पाच हजार रुपये, मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांना दोन हजार रुपयांऐवजी दहा हजार रुपये आणि दुचाकीवर दोनपेक्षा जास्त व्यक्तींनी प्रवास केल्यास २०० रुपयांऐवजी दोन हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. तसेच, किमान दंड ५०० रुपये असणार आहे. शहरात वाहतुकीच्या नियमनासाठी ३५० वाहतूक पोलिस असून, त्यांच्याकडे कारवाईसाठी १८० यंत्रे देण्यात आली आहेत. मात्र, वाहतूक पोलिसांकडून गेले दोन दिवस जुन्याच पद्धतीने दंडवसुली सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

यासंदर्भात वाहतूक विभागातील काही कर्मचाऱ्यांनी सांगितले, ‘‘राज्याच्या पातळीवर सर्व यंत्रांमधील दंड वसुलीच्या नवीन दरांबाबतचे बदल करावे लागणार आहेत. जोपर्यंत यंत्रांमध्ये बदल होत नाहीत, तोपर्यंत आम्हाला वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून जुन्याच पद्धतीने दंड घ्यावा लागेल. येत्या १० ते १५ दिवसांत या यंत्रांमधील सॉफ्टवेअर अद्ययावत होणे अपेक्षित आहे. त्यानंतर नवीन नियमानुसार दंड आकारणी सुरू होऊ शकते.’’

loading image
go to top