Nana Fadnavis Wada : पुणे परिसर दर्शन : मेणवली येथील नाना फडणवीस वाडा

पेशवाईतील फारसे वाडे शिल्लक नाहीत आणि असले तर त्याची अवस्था चांगली नाही, पण वाईजवळ मेणवली येथे नाना फडणवीस यांचा वाडा आहे आणि तो चांगल्या स्थितीतही आहे.
Nana Fadnavis Wada
Nana Fadnavis Wadasakal
Summary

पेशवाईतील फारसे वाडे शिल्लक नाहीत आणि असले तर त्याची अवस्था चांगली नाही, पण वाईजवळ मेणवली येथे नाना फडणवीस यांचा वाडा आहे आणि तो चांगल्या स्थितीतही आहे.

पेशवाईतील फारसे वाडे शिल्लक नाहीत आणि असले तर त्याची अवस्था चांगली नाही, पण वाईजवळ मेणवली येथे नाना फडणवीस यांचा वाडा आहे आणि तो चांगल्या स्थितीतही आहे. नाना फडणवीस यांना वाईच्या पश्चिमेकडील भाग भगवानराव त्र्यंबक पंतप्रतिनिधी यांनी इनाम म्हणून दिला. त्यांनी १७६८ मध्ये मेणवली हे टुमदार गाव वसवले आणि कृष्णा नदीच्या काठावर एक चौसोपी दोन मजली वाडा बांधला. वाड्यात कारंजे, विहीर, पोटमाळा आणि इतर अनेक सोयी असे काम केलेले आहे. संपूर्ण वाड्याला दगडी तट बांधलेला आहे.

त्याचबरोबर कृष्णा नदीवर एक चंद्रकोरीच्या आकाराचा घाट आणि घाटावर एक विष्णू मंदिर आणि एक मेणेश्वर नावाचे शिवालय बांधले. त्याच्याच बाजूला एक भव्य घंटा जमिनीवर बसवलेली दिसते. ही घंटा म्हणजे चिमाजी अप्पांनी वसई मोहिमेमध्ये पोर्तुगीजांच्या चर्चवरील अनेक घंटा काढून आणल्या, त्याच्यातली एक असून ती मंदिराच्या बाजूला जमिनीवर बसवलेली आहे. त्याच्यावर ख्रिश्चन चिन्ह कोरलेले दिसून येते. अशा बऱ्याच घंटा वेगवेगळ्या मंदिरांपाशी बसवलेल्या आहेत. पेशवाईमध्ये भव्य वाडा, नदीवरचा घाट आणि मंदिर या तीन प्रकारची बांधकामे सगळ्यात जास्ती केलेली दिसून येतात. मेणवलीला हे तीनही प्रकार एकत्र बघता येतात आणि चांगल्या स्थितीत.

वाड्यात नेहमीच्या सोयी व्यतिरिक्त एक नानांचा छोटा दरबार, त्याच्या शेजारी एक विश्राम कक्ष आहे. दरबारात जाण्यासाठी एक लपलेला अरुंद जिना आहे आणि चोर वाटेने घाटावर जाण्याची सोय आहे. पूर्वेला मुख्य दरवाजा आहे, त्यावर नौबतखाना असून समोरच एक त्यावेळचा गोरख चिंचेचा वृक्ष आहे. नानांनी या वाड्यात बरीच मोडी लिपीतील कागदपत्रे आणि इतर किमती साहित्य हलवले होते. ते आता ‘मेणवली दप्तर’ म्हणून ओळखले जाते.

मेणवलीला जाण्याबरोबरच जवळच असलेल्या वाईमध्ये कृष्णाकाठी असलेले गणपती मंदिर आणि वाईचा घाट पाहता येतो. पेशव्यांचे सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी हे मंदिर १७६२ मध्ये बांधले. नदीपात्रात असल्यामुळे आणि नदीला पावसाळ्यात पूर येत असल्यामुळे याचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. पश्चिमेकडे होडीसारखे थोडे त्रिकोणी बांधकाम आहे. कळस उंच असून नदीचे वाढलेले पाणी सहज निघून जाईल अशी त्याची रचना आहे.

बसलेल्या अवस्थेतील चतुर्भुज गणेशाची मूर्ती फारच विलोभनीय आहे. कर्नाटकातून आणलेल्या काळ्या पाषाणात ही मूर्ती घडवली असून आकाराने भव्य असल्यामुळे त्याला ‘ढोल्या गणपती’ असेही म्हणतात. तसेच, कृष्णा नदीच्या काठाला बांधलेले दगडी घाट सुद्धा बघण्यासारखे आहत. वाई आणि मेणवली ही ठिकाणे हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी अत्यंत आवडती ठिकाणे आहेत.

काय पहाल

मेणवलीला नाना फडणवीस वाडा, वाड्याचे मजबूत बांधकाम, जवळजवळ २५० वर्षे झालेली आहेत तरी बांधकाम चांगल्या अवस्थेत आहेत. कृष्णाकाठचा घाट आणि दोन मंदिर, वाईचा ढोल्या गणपती आणि नदीवरचा घाट.

कसे पोहचाल

पुण्याहून वाईला बसने जाऊन तिथून बसने किंवा जीपने मेणवलीला जाता येते.

- सतीश मराठे, इतिहासप्रेमी- गिर्यारोहक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com