बारामतीत प्रथमच प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग; रुग्णाचे प्राण वाचविण्यास यश

मिलिंद संगई
Thursday, 1 October 2020

बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिलीच नव्हे तर इतरही रुग्णालयात आजवर प्लाझ्मा थेरपी वापरण्यात आली नव्हती, अशी माहिती डॉ. महेश जगताप यांनी दिली. प्रथमच ही थेरपी वापरली व हा प्रयोग य़शस्वी झाला. 

बारामती : कोरोनाच्या रुग्णाला प्लाझ्मा थेरपीचा चांगला फायदा होतो ही बाब बारामतीत पुढे आली आहे. बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णावर ही थेरपी वापरुन सदर रुग्ण ठणठणीत बरा झाल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. 

 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बारामती तालुक्यातील या रुग्णाला 12 सप्टेंबर रोजी सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात दाखल केले होते. इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील हे एक नामवंत राजकीय नेतृत्व आहे. त्या वेळेस त्यांची प्रकृती चिंताजनक होती. डॉ. सदानंद काळे, डॉ. राहुल मस्तुद,  डॉ. महेश जगताप, डॉ. निर्मल वाघमारे, डॉ. समाधान चवरे, डॉ. रणजित मोहिते, डॉ. नरुटे  यांनी या रुग्णावर उपचार सुरु केले. त्यांना आवश्यक इंजेक्शन्स देऊनही त्यांच्या प्रकृतीत म्हणावी अशी सुधारणा काही होत नव्हती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्या नंतर प्लाझ्मा थेरपीचे उपचार करण्याचा निर्णय डॉ. मस्तुद यांनी घेतला. संबंधित रुग्णासाठी त्याच्या नातेवाईकांनी पुण्यातून काही तासात प्लाझ्माची सोय केली. सुदैवाने ही प्रणाली संबंधित रुग्णावर परिणामकारक ठरली व आज त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिलीच नव्हे तर इतरही रुग्णालयात आजवर प्लाझ्मा थेरपी वापरण्यात आली नव्हती, अशी माहिती डॉ. महेश जगताप यांनी दिली. प्रथमच ही थेरपी वापरली व हा प्रयोग य़शस्वी झाला. 

आता लॉयब्ररी देखील ऑनलाईन; विद्यार्थ्यांनो घरबसल्या करा अभ्यास

विशेष म्हणजे संबंधित रुग्णाचे वयस्कर वडीलही कोरोना पॉझिटीव्ह होते, त्यांनाही बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयातच दाखल करण्यात आले होते व तेही येथूनच ठणठणीत बरे होऊन घरी गेले.

बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात विनामूल्य उपचार होतात व त्यांचा दर्जा उत्तम आहे ही बाबच या निमित्ताने अधोरेखीत झाली. डॉ. काळे, मस्तुद व जगताप या त्रिकुटाने एक वेगळा निर्णय घेत एका रुग्णाचे प्राण वाचविले. संबंधित रुग्ण व त्याच्या नातेवाईकांनीही प्लाझ्मा आणण्यासाठी जी तत्परता दाखवली, तीही वाखाणण्याजोगी अशीच होती. सरकारी रुग्णालयातील उपचारांचा दर्जा एखाद्या रुग्णाचे प्राण वाचविणारा आहे, हेच या निमित्ताने स्पष्ट झाले. 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plasma therapy experiment for the first time in Baramati