#DonateBlood प्लेटलेटसाठी रक्तपेढ्यांची दमछाक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

पुणे - डॉक्‍टरांनी प्लेटलेट्‌स आणायला सांगितले की, अंगावर अक्षरशः काटा येतो... किती रक्तपेढ्या फिराव्या लागतील, हे सांगता येत नाही... कारण शहरातील रक्तपेढ्यांमध्ये प्लेटलेट्‌सचा तुटवडा आहे, आपला जुळा भाऊ केदारला प्लेटलेट्‌स घेण्यासाठी रुग्णालयातून धावतपळत बाहेर पडणारा मंदार ‘सकाळ’शी बोलत होता...

पुणे - डॉक्‍टरांनी प्लेटलेट्‌स आणायला सांगितले की, अंगावर अक्षरशः काटा येतो... किती रक्तपेढ्या फिराव्या लागतील, हे सांगता येत नाही... कारण शहरातील रक्तपेढ्यांमध्ये प्लेटलेट्‌सचा तुटवडा आहे, आपला जुळा भाऊ केदारला प्लेटलेट्‌स घेण्यासाठी रुग्णालयातून धावतपळत बाहेर पडणारा मंदार ‘सकाळ’शी बोलत होता...

डॉक्‍टरांनी केदारच्या प्लेटलेट्‌स कमी झाल्याचे सांगितले. त्याच्यासाठी प्लेटलेट्‌स आणा, असा निरोप नर्सने दिला. कालही प्लेटलेट्‌ससाठी शोधाशोध करावी लागली. आजही पुन्हा प्लेटलेट्‌स शोधण्यासाठी एक-दोन रक्तपेढ्यांना दूरध्वनी केले आहेत; पण रक्तगट जुळत नाही. त्यामुळे आता इतर रुग्णालयांच्या रक्तपेढ्यांमधून प्लेटलेट्‌स मिळतील का, हा प्रश्‍न मला सतावतोय, असेही मंदारने सांगितले. 

२० टक्के मागणी वाढली
डेंगीमुळे काही रुग्णांमधील प्लेटलेट्‌सचे प्रमाण कमी होते. त्यामुळे अशा रुग्णांना प्लेटलेट्‌स देण्याचा सल्ला डॉक्‍टर देतात. शहरात सध्या डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातून डेंगीच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होणारे रुग्णही वाढत असून, त्यातील काही जणांना प्लेटलेट्‌सची निकड भासते. त्यामुळे प्लेटलेट्‌सची मागणी २० टक्‍क्‍यांनी वाढली आहे. शहरातील प्लेटलेट्‌सची मागणी वाढली असल्याची माहिती शहरातील वेगवेगळ्या रक्तपेढ्यांशी साधलेल्या संपर्कातून पुढे आली. शहरात या महिन्यात रोज डेंगीचे तीन नवीन रुग्णाचे निदान झाले आहे. ऑगस्टमध्ये आतापर्यंत ७८ रुग्ण आढळले आहेत. गेल्या आठ महिन्यांमध्ये डेंगीच्या २१४ रुग्णांची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागात झाली आहे.

डेंगीमुळे प्लेटलेट्‌सची मागणी वाढली असली तरीही, मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात येत आहे. त्यासाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
- डॉ. अतुल कुलकर्णी,  कार्यकारी संचालक, जनकल्याण रक्तपेढी

प्लेटलेट्‌सची मागणी वाढल्याने गेल्या दोन दिवसांपासून तुटवडा जाणवत आहे. रक्तदात्यांशी संपर्क साधून त्यांना रक्तदानाचे आवाहन केले आहे.
- डॉ. स्मिता जोशी, सह्याद्री हॉस्पिटल

प्लेटलेट्‌स फक्त पाच दिवस राहतात. त्यामुळे त्यादृष्टीने रक्तदान शिबिरांचे नियोजन केले आहे. मागणीप्रमाणे पुरवठ्यासाठी शिबिरांचे योग्य नियोजन गरजेचे असते. 
- डॉ. आनंद चाफेकर, केईएम

प्लेटलेट्‌सच्या वाढत्या मागणीचा विचार करून शिबिरांचे नियोजन केल्याने मागणीप्रमाणे पुरवठा करता येत आहे; पण त्याचवेळी कर्करोगाचे  उपचार आणि अवयव प्रत्यारोपणासाठी प्लेटलेट्‌सची मागणी वाढते.
- डॉ. संजीव केतकर,  दीनानाथ मंगेशकर रुग्णालय

सिंगल डोनर ए सेरेसिस या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे रुग्णावर प्रभावी उपचार करण्यात मदत होते.
- डॉ. स्नेहल मुजुमदार,  रक्तपेढी प्रमुख, रुबी हॉल क्‍लिनिक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Platelets shortage in hospital