भंगारमाल व्यवसायिकाच्या दुकानात तब्बल अकराशे जिवंत काडतुसे, बुलेट लिडचा साठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra modi visit to pune police action sracp trader caught bullets gun crime news pune

भंगारमाल व्यवसायिकाच्या दुकानात तब्बल अकराशे जिवंत काडतुसे, बुलेट लिडचा साठा

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्‍वभुमीवर पुणे पोलिसांकडून गुन्हेगारांच्या शोधासाठी राबविलेल्या "ऑपरेशन ऑल आऊट'मध्ये तब्बल अकराशेहून अधिक बंदुकीच्या गोळ्या (जिवंत व खराब काडतुसे), बुलेट लिड शनिवारी रात्री पोलिसांच्या हाती लागले. गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाने बंदुकीच्या गोळ्यांचा साठा जप्त केला असून भंगारमाल व्यावसायिकालाही बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, त्याच्याकडे बंदुकीच्या गोळ्यांचा इतका मोठा साठा कुठून आला व कोणासाठी आणण्यात आला होता, हा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून शहरातील गुन्हेगारी टोळ्यांवर प्रतिबंधात्मक कारवायांद्वारे चांगलाच वचक बसविण्यात आला आहे.

असे असतानाच दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याला दोन दिवस शिल्लक असताना आणि या दौऱ्याच्या पार्श्‍वभुमीवरच सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यासाठी पोलिस आयुक्त गुप्ता यांनी विशेष मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते. त्याच मोहिमेत हा साठा पोलिसांना सापडला. गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाकडून या मोहिमेअंतर्गत शनिवारी रात्रगस्त घातली जात होती. त्यावेळी गुरुवार पेठेतील गौरी आळी येथे भंगारमाल व्यावसायिकाने त्याच्या दुकानात बंदुकीच्या गोळ्या ठेवल्याची खबर गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार, युनीट एकच्या पथकाने शनिवारी रात्री नऊ वाजता गौरी आळी येथील भंगारमाल विक्रीच्या दुकानावर छापा टाकला.

त्यावेळी संबंधित दुकानामध्ये दिड लाख रुपये किंमतीचा 56 जिवंत काडतुसे,79 खराब काडतुसे, 970 बुलेट लिड असा एकूण अकराशेहून अधिक बंदुकीच्या गोळ्यांचा साठा सापडला. याप्रकरणी पोलिसांनी दुकानदार दिनेशकुमार कल्लुसिंग सरोज (वय 34, रा.पर्वती दर्शन, मुळ रा.प्रतापगढ, उत्तरप्रदेश) यास अटक केली. त्याच्याविरुद्ध भारताचा हत्याराबाबतचा कायदा, महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने संशयित आरोपीस 15 जुन पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. हि कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदिप भोसले, पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, अजय जाधव, पोलिस कर्मचारी अजय थोरात, अमोल पवार, अय्याज दड्डीकर, इम्रान शेख, महेश बामगुडे यांच्या पथकाने केली.

इतक्‍या बंदुकीच्या गोळ्या आल्या कुठून ?

भंगारमाल व्यावसायिकाकडे इतक्‍या मोठ्या प्रमाणात बंदुकीच्या गोळ्यांचा साठा आला कुठून असा प्रश्‍न पोलिसांनाही पडला आहे. त्याने हि काडतुसे, बुलेट कोठून आणली, त्याने कोणत्या कारणासाठी जवळ बाळगली होती, यापुर्वी त्याने इतर कोणाला शस्त्र व गोळ्यांचा साठा पुरविला होता का ? याचा गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून तपास केला जात आहे.

जुन्या मालकानेच हा माल ठेवल्याचा जबाब

संबंधित भंगारमालाचे दुकान हे चुनीलाल राठोड यांच्या मालकीचे होते. मात्र 10 वर्षांपुर्वी त्यांचा मृत्यु झाला. त्यानंतर त्यांच्याकडे काम पाहणाऱ्या दिनेशकुमार सरोज यानेच त्यांचा व्यवसाय सुरु ठेवला. दरम्यान, सरोज याच्याकडे बंदुकीच्या गोळ्या असून तो त्या विक्री करण्यासाठी सावज शोध असल्याची कुणकुण पोलिसांना लागली. त्यानुसार, पोलिसांनी त्यास अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्याने, या गोळ्या त्याच्या पुर्वीच्या मालकानेच ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली. तरीही पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्वबाजुंनी तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Pm Narendra Modi Visit To Pune Police Action Sracp Trader Caught Bullets Gun Crime News Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top