पुणे मनपा अर्थसंकल्प : आरोग्यासाठी 48 कोटींची तरतूद 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 February 2020

पुणेकर आणि पुण्याचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी या अर्थसंकल्पात जवळपास सुमारे 48 कोटी रुपयांच्या विविध योजना सादर केल्या आहेत.

पुणे - पुणेकर आणि पुण्याचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी या अर्थसंकल्पात जवळपास सुमारे 48 कोटी रुपयांच्या विविध योजना सादर केल्या आहेत. महापालिकेच्या आरोग्य योजनांसाठी हेल्थ कार्ड, महिलांसाठी कर्करोग निदान, बालकांसाठी हृदयरोग निदान व उपचार यासह नानाजी देशमुख सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अशा 14 योजनांचा त्यात समावेश आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलो करा ई-सकाळचे ऍप 

महापालिकेच्या नायडू रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी 24 कोटी रुपयांची तरतूद केली. हृदयविकार, कर्करोग, मूत्रपिंड, मज्जातंतूशी संबंधित आजार आणि त्यावर शस्त्रक्रियेसाठी सुपरस्पेशालिटीची गरज आहे. त्यासाठी महापालिकेच्या दहा हजार चौरस मीटरहून अधिक जागेवर नानाजी देशमुख सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद केली. हा प्रकल्प वित्त किंवा हॉस्पिटल उभारणीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांकडून अत्यल्प व्याजदरात अर्थसाहाय्य उपलब्ध करून आणि खासगी भागीदारी सहभागातून (पीपीपी) उभारण्याचे नियोजन आहे. 

अतिदक्षता विभागांसाठी सहा कोटी 
महापालिकेच्या नायडू, कमल नेहरू, दळवी आणि सोनावणे या हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग पीपीपी तत्त्वावर चालविण्यासाठी सहा कोटी रुपयांची तरतूद केली. स्व. मधुकर बिडकर रक्तपेढी उभारण्यासाठी एक कोटी, महापालिकेच्या 18 रुग्णालयांमध्ये महिलांमधील कर्करोगाचे निदान करणारी यंत्रणा उभारण्यासाठी दहा लाख आणि मुकुंदराव लेले दवाखान्यात पॅथॉलॉजी लॅब उभारण्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद केली. 

"स्मार्ट हेल्थ कार्ड'साठी तरतूद 
महापालिकेच्या वतीने शहरी गरीब योजना, आजी-माजी सभासदांसाठी आरोग्य योजना, कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य योजना, पंडित दीनदयाळ अपघात विमा योजना, डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी, किशोरवयीन मुलींची, महिलांची आरोग्य तपासणी, डायग्नोसिस, डायलिसिस सेंटर अशा योजना राबविल्या जातात. या योजनांच्या सुसूत्रतेसाठी आणि आरोग्य विषय माहिती सहज उपलब्ध होण्यासाठी लाभार्थ्यांना "स्मार्ट हेल्थ कार्ड' देण्याची योजना अर्थसंकल्पात मांडली. त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केला. हे कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMC Budget 48 Crores Scheme for Health