पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी सहाशे कोटी रुपयांची तरतूद

pmc-transport
pmc-transport

पुणे - शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 18 कलमी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. मिडी बस, उड्डाण पूल, ग्रेड सेपरेटर, मेट्रोचे जाळे, बीआरटी, एचसीएमटीआर प्रकल्प (उच्चक्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग), शिवणे-खराडी नदीकाठ रस्ता, कात्रज- कोंढवा रस्ता, बालभारती ते पौडफाटा रस्ता विकसित करणे आदी सुमारे सहाशे कोटी रुपयांच्या योजना प्रस्तावित केल्या आहेत. 

शहरातील प्रमुख तेरा ठिकाणी उड्डाण पूल आणि ग्रेड सेपरेट उभारण्यासाठी सर्वाधिक 230.79 कोटी रुपयांची तरतूद केली. शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या एसचीएमटीआर प्रकल्पासाठी 172 कोटी, तर पीएमपीच्या ताफ्यात नवीन 300 ई-बस खरेदी करण्यासाठी 72 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केला. पूर्व व पश्‍चिम उपनगरांना जोडणाऱ्या शिवणे ते खराडी हा 18 किलोमीटरचा रस्ता विकसित करण्यासाठी 18 कोटी, तर काजत्र ते कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 24 कोटी रुपयांची तदतूद केली. 

वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेटदरम्यान मेट्रो प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्याबरोबर सिंहगड रस्ता ते पुणे कॅंटोमेंट, वारजे ते स्वारगेट, रामवाडी ते वाघोली व वनाज ते चांदणी चौक आणि स्वारगेट ते कात्रज आणि शिवाजीनगर ते हडपसर या मार्गांचा सर्वंकष प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद केली. 

शहरातील 18 उड्डाण पुलाखाली असलेल्या मोकळ्या जागेवर अनधिकृत पार्किंग आणि अतिक्रमणे होत आहेत. ते टाळण्यासाठी पुलाखालील जागा बंदिस्त करून तेथे सुशोभीकरण करण्यासाठी चार कोटी रुपयांची तरतूद केली. लालमहाल ते फडगेट पोलिस चौकीदरम्यान होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ग्रेड सपेटर प्रस्तावित करण्यात आले असून, त्यासाठी चार कोटी रुपयांची तरतूद केली. 

एक रस्ता; एक एकक... 
"एक रस्ता, एक एकक' ही नवीन संकल्पना प्रथमच मांडण्यात आली आहे. त्यासाठी दोन कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. बंडगार्डन जंक्‍शन ते मुंढवा पूल डीपी रस्त्यासाठी, खडकवासला ते स्वारगेट सायकल ट्रक उभारण्यासाठी प्रत्येकी 2 कोटी, साधू वासवानी ते बंडगार्डन पुलाची पुनर्निर्मिती करणे, बीआरटी मार्गासाठी 9 कोटी 60 लाख रुपये, वाहतूक जनजागृती अभियानासाठी 50 लाख, बालभारती ते पौडफाटा 2 किलोमीटर लांबीच्या आणि 30 मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी 32 लाख रुपयांची तदतूद केली आहे. 

मिडी बससाठी 25 कोटी 
शहराच्या मध्यवस्तीत भागातील रस्त्यांची रुंदी कमी असल्याने मध्यम आकाराच्या 32 आसनी क्षमतेच्या मिडी बस भाडेतत्त्वावर घेण्याची योजना प्रस्तावित केली. त्यासाठी अर्थसंकल्पात 25 कोटी रुपयांची तरतूद केली. डेक्‍कन ते पूलगेट, स्वारगेट ते पुणे स्टेशन, स्वारगेट ते शिवाजीनगर (भवानी पेठ, गंज पेठ मार्गे) या मार्गसह स्वारगेट-टिळक रस्ता- खजिना विहीर- अप्पा बळवंत चौक, पुणे स्टेशन मार्ग पुलगेट हा वर्तुळाकार मार्ग या गाड्यांसाठी प्रस्तावित केला. या मार्गावर तिकिटाचे शुल्क दिवसभरासाठी दहा रुपये असणार असल्याचे या प्रस्तावात नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com