वडाचीवाडी : रखडलेला विकास मार्गी लागेल?

संदीप जगदाळे
Thursday, 14 January 2021

हे गाव महापालिकेत समाविष्ट झाल्याने गावाचा नियोजित विकास होईल, तसेच पुरेशा प्रमाणात पाणी मिळेल आणि रखडलेला विकास मार्गी लागेल, अशी अपेक्षा गावकऱ्यांना आहे.

हडपसर - पिण्याच्या पाण्याची वानवा.... सांडपाणी व्यवस्थेचा उडालेला बोजवारा... जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढीग.... गावात सरकारी दवाखाना नाही.... निकृष्ट व अरुंद रस्ते.... अनधिकृत बांधकामांचे वाढते पेव... मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगणाचा अभाव... आणि झपाट्याने वाढणारे नागरिकरण, मात्र त्या तुलनेत ग्रामपंचायतीचे उत्पन्न तुटपुंजे, त्यामुळे रखडलेली विकासकामे... या आहेत समस्या वडाचीवाडी ग्रामस्थांच्या. हे गाव महापालिकेत समाविष्ट झाल्याने गावाचा नियोजित विकास होईल, तसेच पुरेशा प्रमाणात पाणी मिळेल आणि रखडलेला विकास मार्गी लागेल, अशी अपेक्षा गावकऱ्यांना आहे.

पुणे शहरालगत असूनही वडाचीवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत गावपण टिकून आहे. आजही येथे मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय सुरू आहे. शेती व्यवसाय पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून, येथे आठमाही शेती चालते. गावाची लोकसंख्या सुमारे चार हजारांच्या घरात आहे. पिण्याचे पुरेसे आणि स्वच्छ पाणी नसल्याने नागरिकांना टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते.  यापूर्वीच अर्धे गाव महापालिकेत समाविष्ट झाले आहे.

पिसोळी : नागरीकरण होतंय पण जुने प्रश्न कायम 

वर्षानुवर्षे मागणी करूनही गावाला रहिवासी क्षेत्राचा दर्जा नसल्याने घरे बांधायची कशी, असा प्रश्न येथील नागरिकांना आहे. त्यामुळे गावात जमिनी मोकळ्या असूनही बांधकामे रखडली आहेत. रहिवासी क्षेत्राच्या तांत्रिक अडचणीमुळे अनधिकृत बांधकामांनाही पेव फुटला आहे. या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी पक्षाचे वर्चस्व आहे. त्यामुळे भविष्यात महाआघाडी सरकारकडून विकास कामांसाठी अधिकचा निधी या गावाला मिळेल, असे येथील ग्रामस्थांना वाटते.

वाघोलीकरांना वेध विकासाचे

ग्रामस्थ म्हणतात...
संजय जाधव (रहिवासी) ः
वीस वर्षांपूर्वी हडपसरमधून गावात राहायला आलो. गावात रस्त्यांची कामे समाधानकारक झाली आहेत. पिण्याच्या पाण्याचा मात्र मोठा प्रश्न आहे. गावठाणाबाहेरील वस्त्यांना अनेकदा टॅंकरने विकत पाणी घ्यावे लागते. पाण्याच्या प्रश्नावर महापालिकेने प्राधान्याने विचार करावा, अशी अपेक्षा आहे.

संपत काळे (युवक) ः बारा महिने टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागते. कोणत्याही सुविधा नसल्या तरी आम्हाला ग्रामपंचायतीला कर भरावा लागतो. गावातील रस्ते, पाणी, कचरा, वीज आणि सांडपाण्याचा प्रश्न महापालिकेत गाव गेल्याने सुटेल, असे वाटते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दृष्टिक्षेपात...
चार हजार  - लोकसंख्या
५७२.३४ -  हेक्‍टर  क्षेत्रफळ
७ - ग्रामपंचायत सदस्य
सरपंच -  दत्तात्रेय बांदल (राष्ट्रवादी काँग्रेस)
अंतर -  पुणे स्टेशनपासून १५ किलोमीटर
वेगळेपण -     प्राचीन विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर, हनुमान मंदिर, राज्य सरकारचा तंटामुक्तीचा पुरस्कार, ग्रामस्वच्छता अभियान

गाव महापालिकेत समाविष्ट झाल्याने नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. महापालिकेत समाविष्ट होताच विकास आराखडा केल्यास आमच्या गावात विकासाच्या मोठ्या संधी आहेत.
- दत्तात्रेय बांदल,  सरपंच 

(उद्याच्या अंकात वाचा महाळुंगे पाडाळे गावाचा लेखाजोखा.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pmc expansion merger 23 villages wadachi wadi