
पिसोळी गावाची लोकसंख्या २००१ च्या जनगणेनुसार ५४१७ आहे, मात्र गेल्या दहा वर्षांत ही लोकसंख्या सुमारे १२ हजाराच्या घरांत पोचली आहे. या गावाच्या मध्यातून कात्रज- मंतरवाडी हा प्रमुख रस्ता जातो.
महापालिकेत गाव समाविष्ट झाल्यामुळे पाणी, कचरा, रस्ते, सांडपाणी आणि आरोग्याचे प्रश्न मार्गी लागतील व नियोजित विकास होईल, असा आशावाद पिसोळी ग्रामपंचायतीतील रहिवाशांना आहे. मात्र, यापूर्वी महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांचे मूलभूत प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. या अनुषंगाने राज्य सरकारने नव्याने समाविष्ट झालेल्या गावांच्या विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच जोपर्यंत गावाचा विकास होणार नाही तोपर्यंत मिळकतकरात वाढ करू नये, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
सुप्रिया सुळे म्हणतात, 'पुण्याचा महापौर आता राष्ट्रवादीचाच'
पिसोळी गावाची लोकसंख्या २००१ च्या जनगणेनुसार ५४१७ आहे, मात्र गेल्या दहा वर्षांत ही लोकसंख्या सुमारे १२ हजाराच्या घरांत पोचली आहे. या गावाच्या मध्यातून कात्रज- मंतरवाडी हा प्रमुख रस्ता जातो. या रस्त्याचे काम रखडल्याने हा रस्ता मृत्यू व वाहतूकोंडीचा सापळा बनला आहे. त्यामुळे महापालिकेत गाव गेल्याने तातडीने या रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी या गावातील ग्रामस्थ करीत आहेत. गावातील अंतर्गत रस्त्यांची ५० टक्के कामे पूर्ण झालेली आहेत. उर्वरित रस्ते अद्याप अपूर्ण आहेत.
अंतर्गत रस्ते अरुंद असल्याने ते धोकादायक आहेत. शहरालगत गाव असल्याने अनेक बांधकाम व्यावसायिकांनी या गावात टोलेजंग इमारती उभारल्या आहेत, मात्र या सोसायटीधारकांना मूलभूत सेवा-सुविधा पुरविण्यात ही ग्रामपंचायत अपयशी ठरली आहे. पिसोळी गावातील काही भागात महापालिकेकडून दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो, मात्र तो अपुरा व अनियमित दाबाने होतो. त्यामुळे अनेक सोसायट्यांना रोज टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे अनेक सोसायट्यांची अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. शहरालगत हे गाव असल्याने मोठया प्रमाणात या भागाचे नागरीकरण होत आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
ग्रामस्थ म्हणतात...
संजय मोरे (नोकरदार) - ग्रामपंचायतीचे उत्पन्न तुटपुंजे असल्याने गावाचा सर्वांगीण विकास करण्यात प्रशासनाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आमचे गाव पालिकेत समाविष्ट झाल्याने खूप आनंद झाला आहे.
संगीता काळे (गृहिणी) - आम्ही नियमितपणे घरपट्टी भरतो, मात्र आमच्या गावात नियमितपणे कचरा उचलला जात नाही. सक्षम सांडपाणी व्यवस्था नाही. काही ठिकाणी सांडपाणी थेट नाल्यात सोडल्यामुळे अनारोग्यकारक परिस्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेने प्राधान्याने हा प्रश्न सोडवायला हवा.
चंद्रकांत रणदिवे (स्थानिक रहिवासी) - महापालिकेने उदयान, महापालिका कार्यालय, क्रीडांगण यासारखी आरक्षणे टाकताना जनतेला विश्वासात घ्यावे. या भागात आजही मोठया प्रमाणात शेती व्यवसाय आहे. त्यामुळे या भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी सर्व गाव निवासी झोनमध्ये समाविष्ट करणे गरजेचे आहे.
संदीप करवंदे (विद्यार्थी) - सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तातडीने सुरू करणे आवश्यक आहे. वाढत्या विकासाचा भार पाहता मोठ्या इमारती दिसतात, पण पायाभूत सुविधा मात्र विकसित झालेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
ग्रामपंचायतीची विहीर आहे; मात्र ती आठमाही चालते. उन्हाळ्यात पाणी कमी पडल्याने नागरिकांना पाण्यासाठी टॅंकरचे पाणी विकत घ्यावे लागते. महापालिकेने कोंढवा येथील टाकीतून पिण्याच्या पाण्यासाठी जलवाहिनी टाकल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकेल.
- मच्छिंद्र दगडे, माजी सरपंच
दृष्टिक्षेपात...
१२ हजार - लोकसंख्या
२५०.५६ हेक्टर क्षेत्रफळ
१३ ग्रामपंचायत सदस्य
सरपंच - दीक्षा निंबाळकर
अंतर - स्वारगेटपासून आठ किलोमीटर
वेगळेपण - प्रसिद्ध पद्मावती मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, कानिफनाथ
मंदिर, गावाला २००८ साली निर्मलग्राम पुरस्कारही मिळाला आहे.