esakal | #PmcIssue असून अडचण, नसून खोळंबा
sakal

बोलून बातमी शोधा

PMC-Issue

घरी स्वच्छतागृह नसल्याने आम्ही सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करतो. अचानक मित्रमंडळ चौकातील सार्वजनिक स्वच्छतागृहाची दुरावस्था झाली आहे. म्हणून साईनाथ मित्रमंडळ चौकातील स्वच्छतागृहात जावे लागते. तिथे सकाळी नागरिकांची गर्दी असल्याने गैरसोय होते.
- ज्ञानेश्वर लेंगडे, रहिवासी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी 

#PmcIssue असून अडचण, नसून खोळंबा

sakal_logo
By
समाधान काटे

मयूर कॉलनी - डाहणूकर कॉलनीशेजारील लक्ष्मीनगर झोपडपट्टीतील नागरिक मूलभूत सुविधांपासून अद्यापही वंचित आहेत. तेथील स्वच्छतागृहाचा प्रश्‍न तर गंभीर आहे.

लक्ष्मीनगर झोपडपट्टीमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह असून अडचण, नसून खोळंबा आहे. वीज नसल्याने रात्री महिला त्या स्वच्छतागृहाचा वापर करण्यास घाबरतात. कारण काही गुंड प्रवृत्तीचे टवाळखोर तरुण बाहेरून दगडे टाकून महिलांना घाबरवतात. आतमधील भांडी फुटलेली आहेत. त्यामुळे तेथील नागरिक विशेषतः महिला त्याचा वापर करत नाहीत. 

अण्णा भाऊ साठे चौकात तीन स्वच्छतागृहे असून एक बंद आणि दोन चालू आहेत; मात्र विजेची सुविधा नाही. आतमध्ये दगडे टाकलेली आहेत. साईनाथ मित्र मंडळ चौकात दोन स्वच्छतागृहे असून वीज गायब आहे. त्याची स्वच्छता केली जात नाही. अचानक मित्रमंडळ चौकात चार स्वच्छतागृहे असून चारही ठिकाणी वीज नाही. पाणी कमी असते. दरवाजे तुटलेले आहेत. आतमध्ये दगड, विटा, माती, कचरा साठलेला आहे. भांडी फुटलेली आहेत. नवीन स्वच्छतागृह बांधून दीड वर्षदेखील झालेले नाही तरीसुद्धा त्या स्वच्छतागृहाची दुरवस्था झालेली आहे. 

महापालिका स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात पहिल्या तीन क्रमांकामध्ये येण्याचे स्वप्न पाहत आहे; मात्र दुसरीकडे स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेअभावी नागरिकांना उघड्यावर जावे लागत आहे. 

याबाबत वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे म्हणाले, ‘त्या भागात कायमस्वरूपी स्वच्छतागृहाची निगा राखण्यासाठी केअर टेकरची नेमणूक करत आहोत. स्वच्छतागृहाची संपूर्ण दुरुस्ती पुढील आठवड्यात केली जाईल. नागरिकांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू नये.’

मुकादम वैजिनाथ गायकवाड म्हणाले, ‘या स्वच्छतागृहाची पाहणी करून ज्या दुरुस्त्या आहेत त्या करण्यासाठी अभियंता विभागाकडे मागील वीस दिवसांपूर्वी पत्रव्यवहार केलेला आहे; मात्र अद्याप ते काम झालेले नाही. नागरिकांनी सार्वजनिक स्वच्छतागृहे स्वतःची आहेत अशा भावनेने ती वापरावीत.

सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये वीज, पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे. दररोज स्वच्छता होत नाही, प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.
- लक्ष्मण पवार, रहिवासी, लक्ष्मीनगर 

loading image
go to top