खासगी बसगाड्यांना पालिका लावणार ‘जॅमर’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यांलगत बेकायदा बसगाड्या उभ्या करून प्रवाशांची वाट पाहणाऱ्या आणि वाहतूक कोंडीत भर घालणाऱ्या खासगी बसना (ट्रॅव्हल्स) आता महापालिकाच ‘जॅमर’ लावणार आहे.

पुणे - वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यांलगत बेकायदा बसगाड्या उभ्या करून प्रवाशांची वाट पाहणाऱ्या आणि वाहतूक कोंडीत भर घालणाऱ्या खासगी बसना (ट्रॅव्हल्स) आता महापालिकाच ‘जॅमर’ लावणार आहे. हा ‘जॅमर’ काढण्यासाठी बसचालकाकडून जागेवरच २५ हजार रुपये वसूल केले जाणार आहेत. गाडी पुन्हा लावल्यास ती जप्त करण्यात येणार आहे. 

या कारवाईत राजकीय हस्तक्षेप आणि दमदाटी होण्याच्या शक्‍यतेने पोलिसांच्या डोळ्यांदेखतच बसगाड्या रोखण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. पुणे- सोलापूर रस्त्यावर (हडपसर), पुणे रेल्वेस्थानक, शिवाजीनगर, संगमवाडी, वाकडेवाडी भागात ही कारवाई होणार असून, त्यासाठी रात्रीच्या वेळी पथके नेमण्यात आली आहेत, असे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

  प्रवाशांची गर्दी असल्याने राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बसस्थानके, रेल्वेस्थानक आणि हडपसर परिसरात खासगी बस उभ्या असतात. विशेषत: रात्रीच्या वेळी रस्त्यांलगतच बस थांबवून प्रवाशांची ने-आण केली जात असल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम म्हणजे त्या-त्या भागांतील वाहतूक कोंडी होऊन स्थानिक रहिवासी, पादचारी आणि वाहनचालकांना मनस्ताप होतो. तक्रारी केल्यानंतरही बसगाड्यांवर कारवाई होत नसल्याचा लोकांचा अनुभव आहे. या पार्श्‍वभूमीवर या बसगाड्यांवर कारवाई करून रस्ते मोकळे करण्याची भूमिका महापालिकेने घेतली आहे. त्यानुसार ज्या ठिकाणी बसमुळे रस्ता अडला आहे, तिथे नियमित कारवाई होणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पितृछत्र हरपले; आईची मृत्यूशी झुंज

महापालिकेच्या हद्दीतील रस्ते, चौक आणि मोकळ्या जागांवर बेकायदा उभ्या राहणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. ज्या भागांत बसगाड्यांमुळे अतिक्रमणे होत आहेत, ती शोधून तेथील रस्ते मोकळे करण्यात येतील, त्यासाठी खास पथके नेमली आहेत.
- माधव जगताप, प्रमुख, अतिक्रमण विभाग, महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMC Jammer to private buses