पितृछत्र हरपले; आईची मृत्यूशी झुंज

दत्ता म्हसकर 
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

आई मृत्यूच्या दारात असतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू झाला आणि पिंपरवाडी (ता. जुन्नर) येथील शाळेत जाणाऱ्या दोन मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

जुन्नर - आई मृत्यूच्या दारात असतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू झाला आणि पिंपरवाडी (ता. जुन्नर) येथील शाळेत जाणाऱ्या दोन मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला. वडिलांच्या दशक्रिया विधीसाठी लागणारे साहित्य विकत घ्यायलाही त्यांच्याकडे काही नाही. ग्रामस्थ दशक्रिया विधी पूर्ण करतील; परंतु आईच्या पुढील उपचारांसाठी व आपल्या शिक्षणासाठी काय करावे, असा मोठा प्रश्‍न त्यांच्यापुढे आहे. त्यांना समाजाकडून आर्थिक आधाराची गरज आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरवाडी येथील जयवंत डामसे हे चाकण (ता. खेड) येथे खासगी कंपनीत नोकरी करून मिळणाऱ्या अल्पशा उत्पन्नात आपली आई, दोन मुले व पत्नी यांच्यासह सुखाने संसार करत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांची पत्नी उषा या कामानिमित्त चाकणला गेल्या होत्या. त्या वेळी दुचाकीवर बसताना तोल गेल्याने त्या कोसळल्या. त्यात त्यांच्या पाठीचा कणा निखळला. मज्जातंतू तुटल्यामुळे तीन शस्रक्रिया झाल्या. तीन विविध रुग्णालयांमध्ये उपचार झाले. पत्नीसाठी जवळची होती नव्हती तेवढी रक्कम व कर्ज घेत सहा-सात लाख रुपये त्यांनी खर्च केले. मात्र, त्यांच्या डोळ्यांची हालचाल होताना फक्त दिसते. त्यांचा मोठा मुलगा राहुल हा दहावीत; तर छोटा मुलगा रोहन हा नववीत शिकत आहे. आईच्या देखभालीसाठी राहुल याला शाळा सोडावी लागली. 

मदतीसाठी खाते क्रमांक 
नाव - उषा जयवंत डामसे    
बॅंक - कॅनरा बॅंक, आपटाळे (ता. जुन्नर) शाखा    
खाते क्रमांक - १५७९१०८०१५३४३    
आयएफसी कोड - CNRB०००१५७९    
एमआयसीआर कोड - ४११०१५५०१

दरम्यान, गेल्या आठ महिन्यांपासून उसनवारी करत डामसे यांनी पत्नीच्या उपचारांसाठी प्रयत्न केले. मात्र, रविवारी २ फेब्रुवारीला पत्नीला भेटायला जाताना चाकण-खेड रस्त्यावर त्यांचा अपघात झाला. उपचारादरम्यान सोमवारी (ता. ३) त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे ढामसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांची दोन मुलं, मृत्यूशी झुंजणारी पत्नी आणि वृद्ध आईच्या दुःखाला पारावर राहिला नाही. वडिलांचा दशक्रिया विधी करण्यासाठीही या किशोरवयीन मुलांकडे पैसे नाहीत. त्यांच्या मामांनी घरातील मंगळसूत्र गहाण ठेवून व उसनवार केली आहे. जयवंत ढामसे यांचा दशक्रिया विधी ग्रामस्थ करणार आहेत. पण, डामसे यांची मुले लहान आहेत. त्यामुळे त्यांना कोण काम देणार, वडिलांचे कर्ज कसे फेडणार, आईच्या उपचाराकरिता कोठून पैसे आणणार, शिक्षणाचा खर्च कसा करणार, असे प्रश्‍न त्यांच्यासमोर उभे आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two children need financial support from the community