डॉक्‍टरांनो, तुम्ही घाबरू नका, आता महापालिका आहे तुमच्या पाठीशी!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 July 2020

शहरातील कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या जनरल प्रॅक्‍टिशनर्सना संरक्षण म्हणून त्यांचा पन्नास लाखांचा टर्म इन्श्‍युरन्स (मुदत विमा) काढण्याचा महापालिकेचा विचार आहे. ​

पुणे : डॉक्‍टरांनो, तुम्ही आता काळजी करू नका, कारण तुमच्या आरोग्याची जबाबदारी पुणे महापालिका घेणार आहे. एवढेच नव्हे, तर कोरोना बाधितांवर उपचार करताना तुम्ही बाधित झाल्यास तुमच्या उपचाराचा सर्व खर्च देखील महापालिका उचलणार आहे. तर चला मग लढूया कोरोनाशी. 

कोरोना बाधितांना उपचार सेवा देणाऱ्या जनरल प्रॅक्‍टिशनर्स, फॅमिली डॉक्‍टरांना पन्नास लाख रुपयांच्या विम्याचे संरक्षण देण्यात यावे, तसेच त्यांना कोरोनाची लागण झाल्यास उपचाराचा संपूर्ण खर्च महापालिकेतर्फे केला जावा, असा प्रस्ताव महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास कोरोनाविरोधी लढाईत योगदान देणाऱ्या जनरल प्रॅक्‍टिशनर्स, फॅमिली डॉक्‍टरांना विमा कवच आणि उपचाराची हमी मिळणार आहे. 

Video : पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत 'मनसे'चं बेड टाकत आंदोलन; पाहा काय केल्या मागण्या​

शहरातील कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या जनरल प्रॅक्‍टिशनर्सना संरक्षण म्हणून त्यांचा पन्नास लाखांचा टर्म इन्श्‍युरन्स (मुदत विमा) काढण्याचा महापालिकेचा विचार आहे. या विम्याचे हप्ते (प्रीमियम) महापालिकेतर्फे भरले जाणार आहेत. त्याचबरोबर कोरोनाग्रस्तांना उपचार सेवा देताना जनरल प्रॅक्‍टिशनर्स आजारी पडल्यास त्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च महापालिकेतर्फे केला जाणार आहे, असे महापालिका आयुक्त रुबल आगरवाल यांनी सांगितले. 

काय सांगता? दुकानदाराला छत्री पडली पावणे दोन लाखाला!

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गेल्या आठवड्यात 'इंडियन मेडिकल असोसिएशन' (आयएमए), 'जनरल प्रॅक्‍टिशनर असोसिएशन' (जीपीए), 'असोसिएशन ऑफ फिशियन ऑफ इंडिया' (एपीआय) या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत जनरल प्रॅक्‍टिशनर, फॅमिली फिजिशियन, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक डॉक्‍टरांना कोरोना संशयित किंवा सौम्य ते मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यास परवानगी देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला.

राज्याला तीन मुख्यमंत्री, पण स्टेअरिंग 'यांच्या' हाती!​

त्यावेळी सरकारी डॉक्‍टरांप्रमाणे जनरल प्रॅक्‍टिशनर्सही कोरोनाबाधितांवर उपचार करणार असल्याने, त्यांना पन्नास लाख रुपयांचे विमा कवच आणि कोरोनाची बाधा झाल्यास उपचारांचा खर्च महापालिकेने करावा. तसेच सरकारी डॉक्‍टरांप्रमाणेच पीपीई किट, मास्क, ग्लोव्ह्ज आदी सुरक्षा साधने पुरविण्यात यावी, अशी मागणी डॉक्‍टर संघटनांच्या प्रतिनिधींनी केली होती. त्यानुसार, महापालिकेच्या आरोग्य विभागाने हा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMC will provide insurance and cost of treatment to the doctors who infected with corona said Municipal Commissioner Rubal Agarwal