पीएमपीच्या ‘बस डे’मुळे प्रवाशांना अवघ्या ५ मिनिटांत बस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PMP-Bus

एरव्ही बस थांब्यावर बसच्या प्रतीक्षेत प्रवाशांना १० ते १२ मिनिटे वाट पहावी लागत. मात्र, सोमवारी पुण्यातील हजारो प्रवाशांना सुखद अनुभव आला.

पीएमपीच्या ‘बस डे’मुळे प्रवाशांना अवघ्या ५ मिनिटांत बस

पुणे - एरव्ही बस थांब्यावर बसच्या प्रतीक्षेत प्रवाशांना (Passenger) १० ते १२ मिनिटे वाट पहावी लागत. मात्र, सोमवारी पुण्यातील हजारो प्रवाशांना सुखद अनुभव आला. अवघ्या पाच मिनिटांच्या आतच त्यांना बस (Bus) उपलब्ध होत होती. त्यामुळे बस थांब्यावरची गर्दी कमी झाली. निमित्त होते पीएमपीच्या ‘बस डे’चे. (PMP Bus Day) यानिमित्ताने पीएमपीने १८५३ बसेस रस्त्यावर उतरविल्या अन प्रवाशांचा प्रवास आनंददायक झाला. सोमवारी ‘बस डे’च्या निमित्ताने सकाळपासून पीएमपीच्या विविध बस डेपोत कर्मचाऱ्यांची वर्दळ सुरु होती. काही गाड्या सजविल्या गेल्या. अधिकाऱ्यांपासून डेपोतील सर्वच कर्मचारी सकाळीच कामावर हजर झाले. परिणामी, प्रवाशांना वेळेत व गतिमान सेवा देणे शक्य झाले. घोले रोड येथील कार्यक्रमात मान्यवरांनी पीएमपीला हिरवा झेंडा दाखविला. एकाचवेळी १८५३ गाड्या रस्त्यावर धावत असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. एरव्ही बसमध्ये चढण्यासाठी होणारी गर्दी, बस थांब्यावर वाट पाहण्याऐवजी पुणेकरांना लगेचच बस उपलब्ध होत असल्याचा चांगला अनुभव आला.

१२ लाख प्रवाशांचे होते उद्दिष्ट

पीएमपीने ‘बस डे’ला सुरुवातीला १८०० गाड्या रस्त्यावर उतरविण्याचा निर्णय घेतला. मात्र, सोमवारी १८५३ गाड्या सोडल्या, याचा प्रवाशांना फायदाच झाला. १२ लाख प्रवाशांचे उद्दिष्ट ठेवले होते. प्रवाशांचा निश्चित आकडा जरी उपलब्ध नसला तरीही उद्दिष्टापेक्षा जास्त प्रवासी संख्या असल्याचे पीएमपी प्रशासनाने सांगितले.

पिंपरीत ‘बस डे’ उत्साहात

पिंपरी - सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्व प्रवाशांना पटवून देण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने पिंपरी-चिंचवड शहरात आज (ता. १८ ) ‘बस डे’ साजरा केला आहे. पीएमपीने जागरूकतेसाठी शहरात विविध फलक लावले होते. प्रवाशांमध्ये कूपनचे वाटप करून, जागृती करण्यात आली. तसेच कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजनही केले होते.

पीएमपीच्या सध्या सरासरी रोज १५५० बस मार्गांवर धावतात. सध्या पीएमपीने प्रवास करणारे रोजचे सुमारे १० लाख ५० हजार प्रवासी आहेत. या निमित्ताने सोमवारी १८६० बसगाड्या रस्त्यावर धावल्या. ठिकठिकाणी कर्मचाऱ्यांनी लकी ड्रॉ काढण्यासाठी प्रवाशांमध्ये कूपनचे वाटप केले. वर्धापन दिनामित्त आणि ‘बस डे’ साठी पीएमपीने जागरूकतेसाठी शहरात विविध फलक लावलेले होते. तसेच कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजनही केले होते. तरुण प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी सध्या प्रायोगिक तत्त्वावर मोफत वाय फाय इंटरनेट सेवा देण्यात आली होती. बस डेनिमित्त प्रवाशांना तिकीट दरात विशेष सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे महिला प्रवाशांचा विशेष डेटा एकत्रित केला जात आहे पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपी) १९ एप्रिल रोजी वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने १४ ते २३ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २२ एप्रिलला बस सेवांची माहिती देणारे प्रदर्शन देखील निगडी, भक्ती-शक्ती येथील चौकांमध्ये दाखविणार आहे. मंगळवारी पिंपरीत ५ आणि १० रूपयांत प्रवास करता येणार आहे. बुधवारी ६० रुपयांचा दैनिक प्रवासाचा पास महिलांना अवघ्या १० रूपयांत मिळणार असल्‍याची माहिती जनसंपर्क अधिकारी सतीश घाटे यांनी दिली.

Web Title: Pmp Bus Day Passenger Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punePassengerPMP Bus
go to top