esakal | ‘पीएमपी’ने गाठला ५० लाखांचा टप्पा
sakal

बोलून बातमी शोधा

‘पीएमपी’ने गाठला ५० लाखांचा टप्पा

पीएमपीने मंगळवारी सर्वाधिक उत्पन्नाचा टप्पा गाठला. सुमारे ५० लाख रुपये उत्पन्न पीएमपीच्या तिजोरीत जमा झाले. सुमारे ३ लाख १५ हजार प्रवाशांनी ‘पीएमपी’च्या बसमधून प्रवास केला. 

‘पीएमपी’ने गाठला ५० लाखांचा टप्पा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे- शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक सुरू झाल्यानंतर पीएमपीने मंगळवारी सर्वाधिक उत्पन्नाचा टप्पा गाठला. सुमारे ५० लाख रुपये उत्पन्न पीएमपीच्या तिजोरीत जमा झाले. सुमारे ३ लाख १५ हजार प्रवाशांनी ‘पीएमपी’च्या बसमधून प्रवास केला. 

कोरोनाचा लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर ‘पीएमपी’ची वाहतूक ३ सप्टेंबरपासून सुरू झाली. सुरवातीच्या टप्प्यात २५ टक्के बस रस्त्यावर आणल्या होत्या;  परंतु आता प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागल्याने त्या प्रमाणात बससंख्या वाढवून पीएमपीने वाहतूक सुरू केली आहे. दिवाळीपूर्वी पीएमपीला दररोज ४०- ४२ लाख रुपये उत्पन्न मिळत होते. दिवाळीच्या चार दिवसांच्या कालावधीत हे उत्पन्न ३५ लाखांपर्यंत घटले होते; परंतु दिवाळी संपली अन्‌ मंगळवारी पीएमपीच्या प्रवाशांची संख्या वाढली. त्यातून ५० लाखांच्या उत्पन्नाचा टप्पा ‘पीएमपी’ने गाठला. ‘पीएमपी’च्या बसगाड्यांनी मंगळवारी सुमारे दोन किलोमीटरच्या प्रवाशांसाठी धाव घेतली, तर १३ हजार २१० फेऱ्या पूर्ण केल्या. काल दिवसभरात १४ बस ब्रेकडाउन झाल्याची माहिती ‘पीएमपी’चे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विमानतळ मार्गावर प्रतिसाद 
पीएमपीने गेल्या महिन्यापासून लोहगाव विमानतळावरून दोन्ही शहरांमध्ये पाच मार्ग सुरू केले आहेत. त्यांचे सुरुवातीचे ५०, १०० आणि १५० तिकीट दर होते; परंतु विमानळावर येणाऱ्या उड्डाणांची संख्या मर्यादित झाल्यामुळे विमानसेवेला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे ‘पीएमपी’ने त्यांचे दर आता २० रुपयांच्या पटीत केले आहेत. तसेच सर्वच प्रवाशांसाठी ही बस खुली केली आहे. त्यामुळे या बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद  मिळू लागला आहे. सुमारे ५८ हजार रुपयांचे उत्पन्न पाच मार्गांवर पीएमपीला मिळाले आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘अटल’ची लोकप्रियता कायम 
पाच रुपयांत ५ किलोमीटर आणि ५ मिनिटांत सेवा देणाऱ्या ‘अटल’बस सेवेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. रिक्षापेक्षा कमी दरात पीएमपी सेवा पुरवत असल्यामुळे या बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे झेंडे यांनी नमूद केले. दोन्ही शहरांतील एकूण ४६ मार्गांवर ही बससेवा सुरू आहे असून, मंगळवारी एका दिवसात या मार्गांवर ३३ हजार ७१७ प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे १ लाख ६८ हजारांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले.

loading image
go to top