#PMPIssue पीएमपीचे प्रवासी आले रडकुंडीला

संतोष धायबर
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

पुणे - स्थळ : पुणे मनपा, वेळ : ६.४७ सायंकाळची... बस थांब्यावर तीन बसमध्ये बसू शकतील एवढे प्रवासी... मात्र बस कधी येईल याचे उत्तर कोणाकडेही नाही... प्रवाशांमध्ये ज्येष्ठ नागरिक, अंध व्यक्ती, महिला व विद्यार्थिनी... अंधार पडू लागतो, तसे प्रवासी अक्षरशः रडकुंडीला येतात अन्‌ बस नियंत्रक हतबल होतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर अखेर ९ वाजता बस थांब्यावर येते आणि प्रवासी आत चढण्यासाठी तुटून पडतात...

ही परिस्थिती आहे, पीएमपीला सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या मार्गाची. तो मार्ग (क्र.१५९) म्हणजे मनपा भवन ते तळेगाव ढमढेरे. या मार्गावर वेळेवर गाड्या उपलब्ध होत नसल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. या मार्गावर एकूण २६ गाड्या आहेत. मंगळवारी या मार्गावरील तब्बल ९ गाड्या बंद होत्या. ही अवस्था नेहमीचीच असल्याचे प्रवासी सांगतात. प्रवाशांची संख्या जास्त असल्यामुळे एका बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसल्याने बस अचानक कोठेही बंद पडते. त्यामुळे या मार्गाचे वेळापत्रक कोलमडते. पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी व बस बंद पडत असल्यामुळे पुढची बस कधी येईल, याचे उत्तर कोणालाही देता येत नाही.

मंगळवारी या मार्गावर दुपारी अडीच वाजता गेलेली बस रात्री सव्वाआठ वाजता आली. या मार्गावर गेलेल्या बसला निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ लागल्यामुळे कर्मचाऱ्यांकडून दंड आकारला जातो. या मार्गावरील वाहतूक कोंडीने चालक त्रस्त झाले आहेत. 

या मार्गावरून प्रवास करणारे अनेक प्रवासी पासधारक आहेत. परंतु, वेळेवर बस येत नसल्यामुळे अनेकजण खासगी वाहनाकडे वळतात. पहिल्याच थांब्यावर बस तुडुंब भरत असल्यामुळे पुढील बसस्थानकांवरील प्रवाशांचा विचार न केलेलाच बरा. सर्वाधिक उत्पन्न देणारा हा मार्ग असतानाही कोणी 
लक्ष का देत नाही, असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे.

या मार्गावरील प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना केल्या जातील. समस्येबाबत तत्काळ माहिती घेऊन सेवा सुधारण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या जातील.
- अजय चारठाणकर, सह व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

प्रवाशांची मागणी
  सकाळी व संध्याकाळी महिलांसाठी स्वतंत्र बसची मागणी
  प्रवाशांच्या संख्येनुसार बसचे नियोजन करावे
  सुस्थितीत असलेल्या बस या मार्गावर सोडाव्यात
  मनपा भवन ते वाघोलीपर्यंत बसची संख्या वाढवावी
  वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मार्गाकडे लक्ष द्यावे

Web Title: PMP Issue Bus Passenger Problem Traffic