पुण्यात 'पीएमपी'ची विमानतळावरून ई-बससेवा सुरू

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 October 2020

गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली विमानतळावरील पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीची) ई-बससेवा आजपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

पुणे ः गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली विमानतळावरील पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीची) ई-बससेवा आजपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या बससेवेचे उद्‌घाटन खासदार आणि एअरपोर्ट ऍडव्हायसरी कमिटीचे अध्यक्ष गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. लोहगाव विमानतळावर हा कार्यक्रम पार पडला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विमानतळ संचालक कुलदीप सिंग, आमदार माधुरी मिसाळ, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरुरे, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे आणि पीएमपीतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रॉपर्टी कार्डला आता कायदाच ठरत आहे अडसर

"अभि' या योजनेतील बसेस सुरवातीला शहरातील पाच मार्गांवर धावणार आहेत. यात एकूण 43 स्मार्ट इलेक्‍ट्रिक बसेस शहरातील विविध भागातून प्रवाशांना विमानतळावर पोचवतील. मध्यंतरीच्या काळात पीएमपीने प्रायोगिक तत्त्वावर 10 बसेस विमानतळावरून सुरू केल्या होत्या. मात्र, कालांतराने त्या बंद पडल्या होत्या. पीएमपीने 50, 100, 150, 180 रुपये याप्रमाणे विविध टप्प्यात तिकीट दर निश्‍चित केले आहेत.

मोठी बातमी : 'सीईटी' परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आणखी एक संधी!

प्रवाशांना बॅगा ठेवण्यासाठी पुरेशी जागा ः
विमान प्रवाशांना या बससेवेची माहिती व्हावी, यासाठी विमानतळ इमारतीमध्ये प्रवासी ज्या गेटमधून बाहेर पडतात, तेथे एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. त्यात बससेवेचे तपशील असतील. तसेच विमानतळाच्या आवारात सहा ठिकाणी इंग्रजी आणि मराठी भाषेत फ्लेक्‍स लावण्यात येणार आहेत. बसमध्ये प्रवाशांच्या बॅगा ठेवण्यासाठी पुरेशी जागा असेल. विमानतळ सेवेच्या बस प्रवासाची माहिती पीएमपीएमएलच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

बसचा मार्ग व संख्या
- विमानतळावरून कोथरूड व पुन्हा विमानतळ - 7 बस
- विमानतळावरून हडपसर ते पुन्हा विमानतळ - 5 बस
- विमानतळावरून हिंजवडी ते पुन्हा विमानतळ - 16 बस
- विमानतळावरून स्वारगेट ते पुन्हा विमानतळ - 7 बस
- विमानतळावरून निगडी ते पुन्हा विमानतळ -8 बस

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMP launches e-bus service from Pune airport