#PMPIssue ‘पीएमपी’च्या ताफ्यातील नव्या मिडी बसला ग्रहण! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

नव्या बसमधील २०० पैकी ३५ बसचे इंजिन अवघ्या सहा महिन्यांत कायमस्वरूपी नादुरुस्त झाल्यामुळे ते बदलण्याची वेळ पीएमपीवर आली आहे. उत्पादक कंपनीने ते बदलून दिले असले तरी, ‘वॉरंटी’च्या कालावधीनंतर कसे होणार, अशी समस्या  पीएमपीसमोर आहे. 

पुणे - पीएमपीच्या ताफ्यात दोन वर्षांपूर्वी दाखल झालेल्या मिडी बसच्या देखभाल-दुरुस्तीसाठी पीएमपीवर मोठ्या प्रमाणावर ताण येऊ लागला आहे. त्यामुळे खर्चातही वाढ होऊ लागली आहे. या नव्या बसमधील २०० पैकी ३५ बसचे इंजिन अवघ्या सहा महिन्यांत कायमस्वरूपी नादुरुस्त झाल्यामुळे ते बदलण्याची वेळ पीएमपीवर आली आहे. उत्पादक कंपनीने ते बदलून दिले असले तरी, ‘वॉरंटी’च्या कालावधीनंतर कसे होणार, अशी समस्या  पीएमपीसमोर आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

टाटा मोटर्सच्या २०० मिडी बस दोन वर्षांपूर्वी पीएमपीच्या ताफ्यात दाखल झाल्या. ९ मीटर लांबी आणि डिझेलवर धावणाऱ्या या बसमध्ये ३२ प्रवासी बसण्याची क्षमता आहे. बस नव्या असल्यामुळे उत्पादक कंपनीकडून त्यांना दोन वर्षांची वॉरंटी आहे. त्यातील सरासरी सुमारे १७० बस दररोज मार्गांवर धावतात. मात्र, गेल्या सहा महिन्यांत या बसपैकी ३५ बसच्या इंजिनमध्ये कायमस्वरूपी बिघाड झाला. त्याची दुरुस्तीही शक्‍य नव्हती. त्यामुळे पीएमपीने उत्पादक कंपनीशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी इंजिन बदलून दिले. एका इंजिनची किंमत सुमारे ५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. वॉरंटी कालावधीनंतर  या बसमध्ये असा बिघाड पुन्हा झाल्यास दुरुस्तीचा खर्च वाढणार आहे. त्याचा परिणाम पीएमपीच्या आर्थिक परिस्थितीवर आणि अप्रत्यक्षपणे प्रवाशांवर होणार आहे. नव्या बसपैकी सुमारे ३१ बस स्वयंचलित गिअरच्या आहेत; परंतु त्यातही बिघाड झालेला आहे. नव्या बसची देखभाल दुरुस्ती नियमितपणे होत असली तरी, त्या बसमध्ये वारंवार बिघाड होत असल्याचा अनुभव काही कामगारांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितला. 

चालकांच्या सवयी कारणीभूत ! 
याबाबत पीएमपीमध्ये विचारणा केली असता, बस दाखल झाल्या तेव्हा एसटी महामंडळातून निवृत्त झालेले अधिकारी वाहतूक व्यवस्थापन करीत होते. त्यांनी नव्या बस लांबच्या मार्गावर सोडल्या. बसची आसन क्षमता ३२ असली तरी त्यात ४० टक्के प्रवासी उभे राहू शकतात. त्यामुळे ५० पेक्षा जास्त प्रवासी बसमध्ये बसल्यास इंजिनवर ताण येतो. प्रत्यक्षात बसमध्ये ७०-८० प्रवासी बसत असत. त्यामुळे इंजिनमध्ये गंभीर स्वरूपाचा बिघाड झाला; तसेच पहिल्या गिअरमध्ये बस चालविण्यासारखी परिस्थिती असते तेव्हाही चालक दुसऱ्या गिअरवरच बस चालवतात. परिणामी, इंजिनवर ताण येऊन बिघाड निर्माण होतो, असे सांगण्यात आले. याबाबत चालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

नव्या बसमध्ये वारंवार बिघाड होत असून, पीएमपीचे अधिकारी, संचालक मंडळ बस कंपनीच्या विरोधात काही बोलत का नाहीत? बसमधील तांत्रिक दोष पाठीशी का घातले जात आहेत, याबाबत सखोल चौकशी झाली, तरच सत्य बाहेर पडेल.
- संजय शितोळे, पीएमपी प्रवासी मंच
 
बस नव्या असूनही त्यांचे सुटे भाग मिळत नाहीत, असे हास्यास्पद कारण पीएमपीचे अधिकारी देत आहेत. व्हेईकल हेल्थ मॉनिटरिंग सिस्टीम गाजावाजा करीत बसविली; परंतु तिचे काय झाले, याबद्दल कोणीच काही बोलत नाही, यातच सगळे काही दडले आहे. 
- दत्तात्रेय फडतरे, प्रवासी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMP new midi bus issue