पीएमपी उभारणार इंधनाचे २० पंप : राजेंद्र जगताप

Sakal-Exclusive
Sakal-Exclusive

पुणे - आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पीएमपीतर्फे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील त्यांच्या जागांत खासगी वाहनांसाठी पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे सुमारे २० पंप उभारण्यासाठीच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. हे पंप कार्यान्वित झाल्यावर पीएमपी ही संस्था शहरातील सर्वांत मोठी इंधन वितरक होणार आहे.

शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपीची १४ आगार आहेत. तसेच दोन्ही शहरांच्या हद्दीत महापालिकांच्या विकास आराखड्यातही पीएमपीसाठी एकूण सुमारे ६० पेक्षा जास्त भूखंड राखीव आहेत. ते ताब्यात घेण्याची प्रक्रिया पीएमपीने दोन्ही महापालिकांच्या मदतीने सुरू केली आहे. पीएमपीच्या आगारांत तसेच ताब्यात आलेल्या मोकळ्या भूखंडांवर पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे २० पंप उभारण्यात येणार आहेत. इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, महाराष्ट्र नॅचरल गॅस निगम लिमिटेड (एमएनजीएल), महेश गॅस आदींशी पीएमपीने याबाबत चर्चा सुरू केली आहे. काही कंपन्यांनी पंपांसाठी जागाही निश्‍चित केल्या आहेत, अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी दिली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पीएमपीच्या कामगार कल्याण मंडळामार्फत या पंपांचे संचलन करण्यात येणार आहे. त्यातून सुमारे ३० कोटी रुपयांपर्यंत दरवर्षी उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा आहे. तसेच पंपांच्या उपक्रमातून मिळणारा नफा कामगार कल्याण मंडळासाठीच वापरण्यात येणार आहे. या पंपांत खासगी वाहनांसाठी पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी उपलब्ध होणार आहे. तसेच इंधन कंपन्यांकडून घाऊक स्वरूपात इंधन खरेदी केल्यामुळे दरातही पीएमपीला सवलत मिळू शकेल. 

तसेच, पीएमपीच्या आगारांतच डिझेल, सीएनजी उपलब्ध होणार असल्यामुळे इंधनासाठी बसच्या अन्य पंपांवरील फेऱ्या कमी होऊ शकतील. पीएमपीच्या दोन आगारांतच सध्या डिझेलचा पुरवठा होतो. मात्र, वर्षभरात २० पंप उभारण्याचे नियोजन पीएमपीने केले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

प्रवासी म्हणतात 
दत्तात्रेय फडतरे -
पीएमपीच्या जागांचा वापर करण्यासाठी पंप उभारणे ही कल्पना चांगली आहे. त्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हायला हवे. म्हणजे त्याचे उद्दिष्ट साध्य होईल. याबरोबरच प्रवासी सेवेचा दर्जा सुधारण्यासाठीही नवे उपक्रम राबविण्याची गरज आहे. म्हणजे कमी झालेली प्रवासी संख्या वाढू शकेल. 

सारिका शिंदे - पीएमपीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी पंपांची योजना चांगली आहे. परंतु, पीएमपीला झेपेल का? या उपक्रमाची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने झाल्यास खरोखरच पीएमपीला चांगले उत्पन्न मिळेल आणि एक नवे रोल मॉडेल शहरात निर्माण होईल. पंप सुरू करताना बससाठी पुरेशा जागा उपलब्ध राहतील, याकडेही लक्ष दिले पाहिजे. 

रूपेश केसेकर - मुळात पीएमपीचे काम हे प्रवाशांना चांगली सेवा आणि सुविधा देणे आहे. पीएमपी ही कंपनी असली तरी, नफ्यासाठी व्यावसायिक संकल्पना राबविणे अपेक्षित नाही. पीएमपीकडे मुबलक जागा असतील, तर त्यावर बस उभ्या करायला हव्यात. म्हणजे रस्त्यावर बस उभ्या केल्यावर त्यातून सुटे भाग चोरीस जाणार नाहीत. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com