
पीएमटी ठेकेदारांवर होणार कायदेशीर कारवाई; लक्ष्मीनारायण मिश्रा
पुणे : पीएमटीच्या ठेकेदारांनी (PMT contractors) अचानक बस सेवा बंद करून पुणेकरांना वेठीस धरले आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांना, कामावर जाणाऱ्या नागरिकांना बसला आहे. ठेकेदारांनी कराराचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पीएमटीचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या काळात बस ठेकेदारांचे नुकसान झाले तेव्हा पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेने (Pune and Pimpri-Chinchwad Municipal Corporation) त्यांना सुमारे १७० कोटीची नुकसान भरपाई दिली.
तसेच यापूर्वी ठेकेदारांना ६६ कोटी रुपये देखील दिली आहेत. सध्याची ५८ कोटी रुपयांची थकबाकी देण्यासाठी गुरुवारी महापालिकेत आयुक्त विक्रम कुमार व पीएमटीचे अध्यक्ष मिश्रा यांनी बैठक घेऊन, निधी मंजूर केला. मात्र, बँक बंद झाल्याने त्यांना हे पैसे देता आले नाहीत. असे असताना रात्री ११ वाजता ईमेल टाकून उद्यापासून गाड्या बंद करणार असल्याचे कळविण्यात आले. मिश्रा म्हणाले, ‘‘बस ठेकेदारांना पैसे देण्यासाठी पाठपुरावा सुरू होता, पण थकबाकी वसूल करण्यासाठी रात्री ईमेल टाकून बससेवा बंद करणे योग्य नाही. हा कराराचा भंग असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
तसेच यापूर्वी अशा प्रकारे बससेवा बंद करणाऱ्या ठेकेदाराचे काम काढूनही घेतले आहे. त्याचाही अभ्यास पीएमटीकडून केला जाईल. विक्रम कुमार म्हणाले, ‘‘ पीएमटीला दोन्ही महापालिकांकडून सहकार्य असते. पण आजच्या संपामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे. यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी ठेकेदारांची बैठक घेतली जाईल, दर दोन महिन्यांनी त्यांना पैसे दिले जाईल असे ठरले आहे. पण अचानक संपावर जाऊन शहर वेठीस ठरणे योग्य नाही.
Web Title: Pmpml Srike Update Legal Action Will Taken Against Pmt Contractors Laxminarayan Mishra Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..