PMRDAच्या अग्निशमन अधिकाऱ्यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक; ठरले महाराष्ट्रातील एकमेव

टीम ई सकाळ
Monday, 25 January 2021

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने अग्निशमन सेवेतील वैशिष्ट्य पूर्ण सेवा यासाठीचे राष्ट्रपतींचे अग्निशमन सेवा पद पीएमआरडीएचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांना जाहीर झाले. 

पुणे : पीएमआरडीएचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांना दुसऱ्यांदा अग्निशमन सेवा राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने अग्निशमन सेवेतील वैशिष्ट्य पूर्ण सेवा यासाठीचे राष्ट्रपतींचे अग्निशमन सेवा पद पीएमआरडीएचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांना जाहीर झाले. सन 2021 या वर्षासाठी अग्निशमन सेवा वैशिष्ट्य पूर्ण सेवेसाठी पुरस्कार प्राप्त करणारे पोटफोडे हे महाराष्ट्रातील एकमेव अग्निशमन अधिकारी आहेत. यापूर्वी सन 2011 मध्ये त्यांना गुणवत्ता पूर्ण सेवे साठीचे राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले आहे.

देवेंद्र प्रभाकर पोटफोडे यांचा अग्निशमन सेवेत 30 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर येथून अग्निशमनातील अभियांत्रिकी पदविका सुवर्णपदकाचे मानकरी ठरून प्राप्त केली. अग्निशमन क्षेत्रातील विविध यंत्रणा, उपकरणे व पद्धती यांचा सखोल अभ्यास करण्याकरता अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रिया, जपान, फ्रान्स, इंग्लंड यासारख्या प्रगत राष्ट्रांच्या अग्निशमन सेवानां त्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या आहेत.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

एमआयडीसीच्या  कोकण विभागा अंतर्गत अत्यंत धोकादायक ज्वलनशील, रासायनिक उद्योगधंदे असणाऱ्या कार्यक्षेत्रात कार्यरत राहून त्यांनी  विविध जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. 2006 ते 2008 या कालावधीत त्यांनी मध्ये पुणे शहराचे  मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून अनेक  लोकोपयोगी व जनजागृतीपर उपाय योजना केल्या होत्या. अत्यंत अनुभवी, धाडसी व सकारात्मक अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

हे वाचा - पश्चिम पट्ट्यात ‘ड्रग्ज पेडलर’चे मजबूत जाळे; मुंबई-पुणे परिसरात बनलाय ‘सेन्सिटीव्ह बेल्ट'

पुणे शहरामध्ये आयोजित केलेल्या काॅमनवेल्थ  युथ गेम स्पर्धत सुमारे 71  देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग होता . या स्पर्धेसाठी पंतप्रधान , राष्ट्रपती व अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.या स्पर्धेच्या संपूर्ण अग्निसुरक्षेची जबाबदारी श्री पोटफोडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली होती. नुकत्याच सिरम इन्स्टिटयूट, पुणे येथील आगीच्या दुर्घटनेत त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी केलेल्या कामाची सर्वांनीच  प्रशंसा केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMRDA fire brigade officer won president medal second time