पाकिस्तानात पोलिसांवर हल्ला

पाकिस्तानात पोलिसांवर हल्ला
Published on: 

पाकमध्ये पोलिसांच्या पथकावर हल्ला
१८ दहशतवादी ठार; ११ कर्मचाऱ्यांचा मृत्यू; पाच वाहनांना आग
पेशावर, ता. ११ (पीटीआय) : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील कोहाट जिल्ह्यात बेकायदा सोन्याच्या खाणकामाविरोधात कारवाई करून परतणाऱ्या पोलिसांच्या पथकावर बुधवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात १८ दहशतवादी ठार झाले, तर ११ पोलिसांचा मृत्यू झाला.
खैबर पख्तुनख्वा पोलिसांच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोहाट शहराजवळील दराबुकाच परिसरात पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने संयुक्त कारवाई केली होती. ही कारवाई करून परतत असताना पोलिसांच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. पोलिसांनी धाडसाने प्रत्युत्तर देत १८ दहशतवाद्यांना ठार केले, असे निवेदनात म्हटले आहे. पाकिस्तान सरकार प्रतिबंधित तेहरिके तालिबान पाकिस्तानच्या दहशतवाद्यांसाठी ‘फितना-अल-खवारिज’ हा शब्द वापरते. पोलिस प्रवक्ते महंमद नौमान झेब यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोहाट आणि करकदरम्यानच्या दरबोकाच जलंधर बांदा परिसरात पोलिसांच्या पथकावर गोळीबार करण्यात आला. मृतांमध्ये डीएसपी हैदर जमान आणि उपनिरीक्षक मुख्तियार यांचा समावेश आहे. हल्लेखोरांनी पोलिसांची पाच वाहने पेटवून दिली. या वेळी दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. या हल्ल्याची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस वाहने घटनास्थळी पाठविण्यात आली. तसेच मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. घटनेनंतर जिल्हा मुख्यालयातील शिक्षण रुग्णालयात आपत्कालीन परिस्थिती घोषित करण्यात आली. खैबर पख्तुनख्वाचे राज्यपाल फैसल करीम कुंडी यांनी पोलिसांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले असून, या हल्ल्याचा अहवाल मागविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.