सिंहगड रस्ता परिसरात 'बटऱ्याभाई' सापडला पोलिसांच्या जाळ्यात

निलेश बोरुडे
Thursday, 29 October 2020

सुमारे अडीच वर्षांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगारास पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ सापळा रचून अटक केली. 

किरकटवाडी : सुमारे अडीच वर्षांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगारास पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ सापळा रचून अटक केली असून त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अभिजीत उर्फ बटऱ्याभाई बाळासाहेब गाडे (वय 28, रा. रायकर नगर, धायरी) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याला पुढील तपासासाठी हवेली पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दुपारी तीन ते चार वाजेच्या दरम्यान अभिजीत गाडे सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ येणार असल्याची व त्याच्या कमरेला गावठी कट्टा लावलेला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला खबऱ्यामार्फत मिळाली होती.

त्यानुसार पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे-पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, रामेश्वर धोंडगे, सहाय्यक फौजदार दिलीप जाधवर, पोलीस हवालदार काशिनाथ राजपुरे, पोलीस नाईक राजू मोमीन, चंद्रकांत जाधव, पोलीस शिपाई अमोल शेडगे, मंगेश भगत, बाळासाहेब खडके, सुधीर अहिवळे, अक्षय जावळे यांनी नांदेड फाटा येथे सापळा रचून अभिजित गाडे यास अटक केली.

गौतम पाषाणकर प्रकरणाला वेगळे वळण; बेपत्ता होण्यामागे बड्या राजकीय व्यक्तीचा हात?

'बटऱ्याभाई'या नावाने गुन्हेगारी क्षेत्रामध्ये ओळख असलेल्या अभिजीत गाडे याच्यावर किरकटवाडीवाडीचे माजी उपसरपंच आशिष सोनवणे यांच्यावर जीवघेणा हल्ला करुन  तलवारी, कोयते घेऊन कोल्हेवाडी येथे दहशत माजविल्या प्रकरणी हवेली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. तसेच कुख्यात गुन्हेगार मयत हसन शेख याच्यावरील हल्ल्यातही सहभाग असल्याप्रकरणी अभिजीत गाडे याच्यावर गुन्हा दाखल आहे. मागील अडीच वर्षांपासून अभिजीत गाडे फरार होता. त्याला आता स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली असून पुढील तपास हवेली पोलिस ठाण्याकडून करण्यात येत आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police arrest criminal with pistol