
कात्रज चौकात आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा लाठीमार
कात्रज - कात्रजसह गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी आदी समाविष्ठ गावांच्या न्यायासाठी आमरण उपोषण सुरू असताना पोलिसांनी लाठीमार केला आहे. कात्रज चौकातून जवळच असलेल्या पंपिग स्टेशनकडे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी जात असलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अडविल्यानंतर लाठीमार केला. त्यामुळे आंदोलनकर्ते संतप्त झाले असून आता मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे न हटण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला आहे. महापालिकेत कात्रजचा समावेश होऊन २५ वर्ष लोटली तरी मूलभूत सुविधा व विकास होत नाही. जाणीवपूर्वक डावलले जात असून नव्याने समाविष्ठ ३४ गावांची तीच अवस्था आहे. महापालिका प्रशासन व राज्यकर्ते याकडे दुर्लक्ष करत असून न्याय मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी नमेश बाबर यांनी कात्रज चौक येथे रविवारपासून आमरण उपोषणाला सुरवात केली आहे.
वेळेवर पाणी सोडण्याची मागणी करण्यासाठी आम्ही काही महिलांसह पंपिंग स्टेशनकडे गेलो होतो. त्यावेळी त्याठिकाणी कोणत्याही महिला पोलिस कर्मचारी नसताना आम्हाला अडविण्यात आले आणि पुरुष पोलिसांकडून आम्हाला धक्काबुक्की करण्यात आली. तसेच, अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांकडून मारहाण करत लाठीहल्ला करण्यात आला. लाठीहल्ला करुन आंदोलन दडपण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे अमृता बाबर यांनी सांगितले.
आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणाच्या मागील बाजूस पंपिग स्टेशन आहे. त्याठिकाणी पाणी पुरवठ्यासाठी मोठे पंप बसविण्यात आलेले आहेत. आंदोलनकर्त्यांनी अचानकपणे तिथे घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हे प्रतिबंधित क्षेत्र असून याठिकाणाहून वापस जाण्याची विनंती पोलिस कर्मचाऱ्यांकडून आणि अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. कोणतीही दुर्घटना घडली असती तर कठीण परिस्थिती निर्माण झाली असती. अशावेळी लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, त्यावेळी त्यांना बाहेर काढत असताना पोलिस कर्मचाऱ्यांकडून धक्काबुक्की झाली.
- सागर पाटील, पोलिस उपायुक्त, परिमंडळ २.
प्रशासनाला प्रश्न सोडविता येत नाहीत. मात्र, आम्ही लोकशाहीच्या माध्यमांतून आंदोलन करत असताना एकप्रकारे ते चिरडण्याचा प्रयत्न पोलिसांना हाताशी धरून करण्यात येत आहे. त्याचबरोबर जाणीवपूर्वक महिला आणि माझ्या कुटुंबियांना यावेळी मारहाण करण्यात आली आहे. प्रशासनाचा हे आंदोलन चिरडण्याचा डाव असला तरी आम्ही आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही. प्रशासनाने आमचा अंत पाहू नये, त्यामुळे लवकर मागण्या मान्य कराव्यात. मागण्या मान्य न झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल.
- नमेश बाबर, आंदोलनकर्ते.
आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या
गावांचा समावेश केवळ कर वसूल करण्यासाठी केला जात असून आमच्या व्यथांकडे कोणाचेच लक्ष नाही
कात्रज व समाविष्ठ गावातील पाणीप्रश्न, वाहतुकीची समस्या, २५ वर्षात एकही क्रीडांगण, महापालिकेचे मोठे रुग्णालय होऊ शकले नाही.
चुकीच्या करपद्धतीमधून महापालिका आमच्यावर दरोडा टाकतेय
आम्ही कर भरतो मग सुविधा का देत नाहीत
गुंठेवारीचा तीनपट कर रद्द करून तो एकपट करून दंड माफ करावा
Web Title: Police Beatings On Protesters In Katraj Chowk
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..