
Pune News : पोलिसांची गुन्हेगारांविरुद्ध धडक मोहीम, ३४ गुन्हेगारांना अटक
पुणे : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मध्यरात्री राबविलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये शहरातील साडेतीन हजारांहून अधिक संशयितांची झाडाझडती घेतली. त्यात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी ३४ जणांना अटक करण्यात आली असून, अन्य तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून २७ कोयते, चाकू, कुऱ्हाड, तलवार असा शस्त्रसाठा जप्त केला आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शहरातील सराईत गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन आणि मोका कायद्यांतर्गत कारवाई सुरू केली आहे. गेल्या दोन आठवड्यात हे तिसरे कोम्बिंग ऑपरेशन होते. १९ ते २० जानेवारीच्या मध्यरात्री राबविण्यात आलेल्या मोहिमेत पोलिसांनी रेकॉर्डवरील तीन हजार ६८३ गुन्हेगारांची तपासणी केली. त्यापैकी ७०९ गुन्हेगार त्यांच्या वास्तव्यास असल्याचे आढळून आले. त्यापैकी गंभीर गुन्ह्यातील ३४ जणांना बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली. त्यात आठ तडीपार गुन्हेगारांचा समावेश आहे.
शहरातील ५३२ हॉटेल, ढाबे, बसस्टॅंड, रेल्वेस्थानक, लॉजेस आणि सार्वजनिक ठिकाणी छापे टाकण्यात आले. पोलिस ठाण्यांकडून त्यांच्या हद्दीत नाकाबंदी करून एक हजार ४४६ वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३२ जणांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच, वाहतूक शाखेकडून एक हजार २२ वाहनचालकांची तपासणी केली. त्यापैकी ११५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
गुन्हे शाखा आणि पोलिस ठाण्यांच्या पथकांनी जुगार खेळणाऱ्या ३४ जणांना अटक केली. खंडणी विरोधी पथकाने शिवाजीनगरच्या वडारवाडी परिसरात छापा टाकून सुरेश किसन कलाधर (वय ५९, रा. वडारवाडी, शिवाजीनगर) याच्याकडून चार लाख २२ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. अमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढव्यात बेकायदा हुक्का पार्लरवर छापा टाकून साहित्य जप्त केले.
हे हुक्का पार्लरवर चालविणाऱ्या हॉटेलमालक प्रकाशसिंग नरसिंग चौहान (वय ३९, रा. कोंढवा) याला अटक केली. गांजा विक्री केल्याप्रकरणी मार्केट यार्डमधून चाँद शेख याला तर, कोंढव्यात आसिफ अतीक मेनन (वय २२) या संशयिताला अटक केली. त्यांच्याकडून सुमारे दोन किलो गांजा जप्त केला.