सावधान! कोरोनाच्या नावावर कोणीही घरी येतंय; आयुक्तांकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

शहरातील विविध पोलिस ठाण्यांना पोलिस आयुक्त गुप्ता यांच्याकडून भेटी दिल्या जात आहे. त्याचबरोबर वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत आहेत.

पुणे - कोरोनाच्या नावाखाली सरकारी कर्मचारी असल्याचे सांगत काहीजण नागरिकांच्या घरी जात असल्याच्या तक्रारी कानावर आल्या आहेत. नागरिकांनी ते अधिकृत सरकारी कर्मचारी असल्याची खात्री करावी व संशय वाटल्यास पोलिसांशी संपर्क करावा, असे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सोमवारी सांगितले. 

शहरातील विविध पोलिस ठाण्यांना पोलिस आयुक्त गुप्ता यांच्याकडून भेटी दिल्या जात आहे. त्याचबरोबर वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत आहेत. त्यामध्ये कोरोनाच्या सद्यस्थितीसह शहरातील गुन्हेगारीचा आढावा घेण्यावर भर दिला जात आहे. 

पोलिस ठाण्यांना भेटी देऊन पोलिसांना धीर देण्याचे काम करीत असल्याचे सांगून गुप्ता म्हणाले, ""शहरात कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. असे असताना कोरोनाचे सर्वेक्षण करण्याचे कारण पुढे करून किंवा सरकारी कर्मचारी असल्याचे सांगून काहीजण नागरिकांच्या घरी जात आहेत, अशा तक्रारी आमच्या कानावर आल्या आहेत. अशा वेळी नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. कोणी व्यक्ती घरात येण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्याकडे ओळखपत्राची विचारणा करावी. ओळखपत्र नसेल आणि संशयास्पद वाटत असल्यास तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी.''

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

शहरातील पोलिस ठाण्यांना भेटी देताना "बेसिक पोलिसींग' करण्यावर भर देण्यावर आमचा भर असेल. तसेच गंभीर गुन्हे व गुन्हेगारांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठीही अधिक लक्ष देण्याचे ठरविले आहे. विशेषतः महिला, वृद्ध नागरिक यांना रात्रीच्यावेळी शहरात सुरक्षित वातावरण निर्माण होईल, यादृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे गुप्ता यांनी स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police commissioner amitabh gupta says take care anyone come fraud officer