esakal | पोलिस ठाण्याचे "डोअर ओपन' 
sakal

बोलून बातमी शोधा

police commissioner talk with people

पोलिस ठाण्याचे "डोअर ओपन' 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिखली  : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालयाने "ओपन डोअर पॉलिसी' स्वीकारली आहे. पोलिस स्टेशन किंवा कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून एखाद्या समस्येचे निराकरण न झाल्यास थेट आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी केले.

चिखली-मोशी हौसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने चिखली, मोशी, डुडुळगाव, घरकुल आदी परिसरातील गुन्हेगारी आणि इतर समस्यांबाबत आयोजित "मुक्त संवाद' या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, नगरसेवक वसंत बोराटे, दिनेश यादव, सागर हिंगणे, नगरसेविका अश्‍विनी जाधव उपस्थित होते. या वेळी रहिवाशांनी आपल्या परिसरातील समस्या पोलिस आयुक्तांसमोर मांडल्या. मोरेवस्ती येथील ताडीविक्री, तसेच कृष्णानगर येथील वाइनविक्री करणाऱ्या दुकानाचे परवाने रद्द करण्याची मागणी नागरिकांनी केली. 

पद्मनाभन म्हणाले, ""एखादा गुन्हा घडत असताना नागरिकांनी सजग राहायला हवे. आपण गुन्हा घडत असताना किंवा गुन्हेगारीला खतपाणी घालणारी समस्या पाहतो. त्याच्यावर चर्चा करतो. परंतु, गुन्हा घडत असताना किंवा वाहतूक, चोरी यासारख्या समस्यांबाबत पोलिसांशी संपर्क साधला जात नाही. नागरिकांनी थेट किंवा फोनवरून पोलिसांशी संपर्क साधावा.'' हॉटेल किंवा मद्यविक्रीचे व्यवसाय सुरू करण्यापूर्वी सोसायटीचे "ना हरकत' प्रमाणपत्र घ्यावे, अशा सूचना रहिवाशांनी केल्या. त्यावर आयुक्तांनी सकारात्मक विचार केला जाईल, असे सांगितले. त्याचबरोबर प्रत्येक सोसायटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची आवश्‍यकता असून, त्यामुळे गुन्हा घडल्यावर त्याचा छडा लावण्याबरोबरच गुन्हेगारी कमी करण्यासाठी त्याचा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. या वेळी लांडगे यांनी कुदळवाडी येथील अवैध व्यवसाय, हातभट्ट्या, वाहतूक समस्या, मोरेवस्ती येथील ताडीची दुकाने आदी समस्यांवर उपाययोजना करण्याची मागणी केली. 

loading image
go to top