पुणे-सोलापूर महामार्गावरील लूटमार करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात

जनार्दन दांडगे
सोमवार, 2 जुलै 2018

रविवारी (ता. १) मध्यरात्रीच्या सुमारास लोणी काळभोर हद्दीत एका ट्रकचालकाला लुटणाऱ्या तीन जणांना लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा घडल्यापासून केवळ चार तासांत अटक केली आहे.

लोणी काळभोर  - पुणे-सोलापूर महामार्गावर रात्रीच्या वेळी ट्रक अडवून लुटमार करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे. रविवारी (ता. १) मध्यरात्रीच्या सुमारास लोणी काळभोर हद्दीत एका ट्रकचालकाला लुटणाऱ्या तीन जणांना लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा घडल्यापासून केवळ चार तासांत अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये तौशिफ महमंदहानिफ शेख (रा. बौद्धवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली), अमर मैनुद्दीन कुरेशी (रा. समतानगर, लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती) व जमिल शुकुर पिरजादे (रा. समृद्धी बिल्डींग, लोणी स्टेशन) यांचा समावेश आहे. याप्रकरणी ट्रकचालक राजेंद्र लक्ष्मण नामदास (वय - ३९, रा. पेन्नुर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. 
       
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. २) रात्री एक वाजता राजेंद्र नामदास हे आपल्या ताब्यातील ट्रक घेवून पुणे-सोलापूर महामार्गावरून पुणे बाजूकडे निघाले होते. याचवेळी लोणी काळभोर गावच्या हद्दीतील माळीमळा येथील राजेंद्र पेट्रोलपंपासमोर वरील आरोपींनी नामदास यांच्या ट्रकला आपली दुचाकी अडवी लावली. तसेच नामदास यांना ट्रकमधून खाली ओढून शिवीगाळ व मारहाण करत त्यांच्या जवळील मोबाईल व ३ हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली. 
     
दरम्यान घडलेल्या गुन्ह्याची माहिती मिळताच लोणी काळभोरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले, पोलीस हवालदार सागर कडू, होमगार्ड व बीट मार्शल यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने सापळा रचून केवळ चार तासात आरोपींना जेरबंद केले. पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश ढवाण अधिक तपास करीत आहेत.

आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता -
अटक केलेल्या आरोपींनी रविवारी रात्री केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली असून गुन्ह्यातील मुद्देमाल देखील त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान पुणे सोलापूर महामार्गावर मागील काही दिवसांमध्ये अशाच प्रकारचे गुन्हे घडले होते, हे गुन्हे या टोळीने केली असल्याची शक्यता लक्षात घेवून पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरु केला आहे.
- महेश ढवाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police have been arrested thiefs on the Pune Solapur highway