पालिकेच्या जागांवर पोलिसांचा कब्जा! 

ज्ञानेश सावंत : सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 November 2020

शहराच्या विविध भागांत महापालिकेची मालकी असलेल्या मोकळ्या जागा आणि काही इमारती पोलिसांना भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. त्यात मुंढवा, हडपसर आणि घोरपडीतील दोन मोकळ्या जागा आणि एका इमारतीतील जागेचा समावेश आहे.

पुणे - महापालिकेने रुग्णालय, क्रीडांगणासाठी राखून ठेवलेल्या मात्र, तात्पुरत्या स्वरूपात पोलिसांना दिलेल्या तीन जागा पुणे पोलिसांकडून महापालिकेला परत मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जागा परत करण्यासह थकीत सव्वाकोटी रुपयांचे भाडे भरण्याचा तगादा लावूनही पोलिस प्रतिसाद देत नसल्याने जागा एकतर्फी काढून घेण्यात येतील, अशा आशयाचे पत्र महापालिकेने पोलिसांना दिले आहे. 

शहराच्या विविध भागांत महापालिकेची मालकी असलेल्या मोकळ्या जागा आणि काही इमारती पोलिसांना भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. त्यात मुंढवा, हडपसर आणि घोरपडीतील दोन मोकळ्या जागा आणि एका इमारतीतील जागेचा समावेश आहे. 1998-1999 मध्ये पोलिस ठाण्यांसाठी या जागा दिल्या आहेत. मात्र या तिन्ही ठिकाणी पोलिस ठाणी सुरू आहेत. या जागा परत द्याव्यात, अशी मागणी महापालिकेने पोलिस आयुक्तांकडे केली आहे; परंतु पोलिसांकडून या जागा परत केल्या जात नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे महापालिकेने आता कठोर पवित्रा घेत, पोलिसांकडील आपल्या मालकीच्या तिन्ही जागांचा ताब्यात घेण्यात येईल, असे कळविले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

मुंढवा आणि हडपसरमधील जागा या रुग्णालयांसाठी आहेत. या दोन्ही जागा महापालिकेला बक्षीसपत्राद्धारे मिळाल्या आहेत मात्र, जागेचा उद्देश साध्य होत नसल्याने त्या जागा परत करण्याची मागणी मूळ जागा मालक करीत आहेत. या पार्श्वभूमीवर ज्या कामासाठी जागा घेतल्या,त्याचसाठी त्यांचा वापरा व्हावा, त्यासाठी पोलिसांकडून लवकर घ्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे. त्याचा आधार घेत, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पुन्हा पोलिसांना पत्र पाठविले आहे. 

व्वा, खगोलप्रेमाला उमपा नाही! पुण्यातील 3 वर्षांच्या राध्यनीने रचला जागतिक विक्रम​

जागा आणि सद्यःस्थिती  
मुंढवा (स. नं. 59) येथील कै. सखाराम कोद्रे रुग्णालयासाठी बांधलेल्या इमारतीत मुंढवा पोलिस ठाण्यासाठी जागा दिली आहे. 
हडपसर येथील (कै.) अण्णासाहेब मगर दवाखान्यासाठी बांधलेल्या इमारतीत हडपसर पोलिस ठाण्यासाठी 1998 मध्ये जागा दिली आहे. हडपसर पोलिस ठाण्यासाठी नव्या इमारतीचे काम पूर्ण झालेले आहे. तरीही ही जागा ताब्यात मिळत नाही. 
घोरपडी (स. नं. 72) येथील क्रीडांगणाची आरक्षित जागा पोलिस चौकीसाठी दिली आहे. या जागेवर मैदान विकसित करण्याची कार्यवाही महापालिका करीत आहे. मात्र पोलिसांकडून जागा मिळत नाही. 

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले संकेत​

महापालिकेने पोलिसांना भाडेतत्त्वावर दिलेल्या जागा 

एकूण जागा  - 18 
इमारती - 14 
मोकळ्या जागा  - 4 
थकलेले भाडे - 1 कोटी 31 लाख 74 हजार रुपये 

रुग्णालये आणि क्रीडांगणाच्या जागा आता त्याच उद्देशासाठी वापरण्यात येणार आहेत. त्याबाबतची प्राथमिक कार्यवाही करीत आहोत. त्यामुळे पोलिसांना दिलेल्या जागा परत घेण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. तसे पत्र पोलिस आयुक्तांना दिले आहे. 
-राजेंद्र मुठे, प्रमुख, मालमत्ता व्यवस्थापन, महापालिका 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police occupy municipal lands