esakal | पुणे : गुन्हेगाराला अटक करण्यास गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यावर कोयत्याने वार

बोलून बातमी शोधा

Crime
पुणे : गुन्हेगाराला अटक करण्यास गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यावर कोयत्याने वार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - सराईत गुन्हेगाराला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हेगाराने कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. मंगळवार पेठेत रविवारी सायंकाळी पाच वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून, दुसरा आरोपी फरार झाला आहे.

कुमार भागवत चव्हाण (वय २१, रा. मंगळवार पेठ), असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर प्रतीक पृथ्वीराज कांबळे (रा. मंगळवार पेठ), असे पळून गेलेल्या संशयिताचे नाव असून त्याला यापूर्वी तडीपार करण्यात आले. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक नरेश केशव वाडेवाले यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

हेही वाचा: "कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचं सरासरी वय ४९ वर्षे"

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार झोपडपट्टीतील गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी मंगळवार पेठेत बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांशी दोघांनी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता. संबंधित तरुण हे चव्हाण व कांबळे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे वाडेवाले हे आपल्या सहकाऱ्यांसह मंगळवार पेठेत आरोपींना पकडण्यासाठी गेले. त्या वेळी कांबळे याने पोलिसांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने वाडेवाले यांच्यावर कोयत्याने वार केला.

वाडेवाले यांनी त्यांच्याकडे असलेल्या लाठीने ते वार झेलून त्याच्या हातातील कोयता हिसकावून स्वतःच्या ताब्यात घेतला. त्या वेळी रिक्षात बसलेल्या चव्हाणने पोलिसांना विटा फेकून मारल्या. या घटनेत पोलिस जखमी झाले. या घटनेनंतर कांबळे पळून गेला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.