बारामतीत गावठी कट्टे व जिवंत काडतुसे पोलिसांनी केले जप्त...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 January 2021

एकाच कारवाईत अर्धा डझनहून अधिक गावठी कट्टे मिळाल्यामुळे बारामतीत पोलीस आता  काळजीत आहेत. गेल्यावर्षी बारामती उपविभागात वीस गावठी कट्टे हस्तगत केल्याची माहिती नारायण शिरगावकर यांनी दिली,

बारामती - एका छोट्याशा धाग्यावरून बारामती तालुका पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून सात गावठी कट्टे व दहा जिवंत काडतुसे असा मोठा ऐवज हस्तगत केला.

एखाद्या चित्रपटात शोभावी अशी ही तपास कथा आहे. बारामती एमआयडीसीमधील एका हॉटेल चालकाला मारहाण करून त्याच्याकडील रोकड पळवून नेण्याचा गुन्हा पोलिसात दाखल झाला होता.  या गुन्ह्याप्रकरणी हव्या असलेल्या आरोपींचा शोध घेताना पोलिसांना आदिनाथ ईश्वर गिरमे (रा. पाटस, ता. दौंड) याचा या प्रकरणात समावेस असल्याचा सुगावा लागला.

देवीच्या मंदिरात महिला पुजारीची मागणी; तृप्ती देसाईंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन 

त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे खोलवर चौकशी केली असता त्याच्या मोटारसायकलच्या डिकी मध्ये एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे सापडली. त्यानंतर पोलिसांनी खोलवर तपास सुरू केला तेव्हा गिरमेचे साथीदार विजय रामदास कराड (रा. टेंभुर्णी, ता. शिरूर, जि. बीड) तसेच अमोल रमेश गरजे (रा. शिरसाटवाडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) या दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या दोघांकडून सहा गावठी कट्टे व आठ जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केली. इतक्या मोठ्या प्रमाणात गावठी कट्टे सापडल्यामुळे पोलिसही हादरून गेले आहेत. पोलिस अधीक्षक डॉ.  अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते व उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी तालुका पोलिसांना कसून चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्यानुसार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस कर्मचारी दादा ठोंबरे, नंदू जाधव, राहुल पांढरे, विजय वाघमोडे, मंगेश कांबळे, विनोद लोखंडे, दत्तात्रेय मदने, रणजित मुळीक यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

एकाच कारवाईत अर्धा डझनहून अधिक गावठी कट्टे मिळाल्यामुळे बारामतीत पोलीस आता  काळजीत आहेत. गेल्यावर्षी बारामती उपविभागात वीस गावठी कट्टे हस्तगत केल्याची माहिती नारायण शिरगावकर यांनी दिली,  नव्या वर्षात पहिल्याच महिन्यात आठ गावठी कट्टे पोलिसांना मिळालेले असल्यामुळे या पंचक्रोशी मध्ये गावठी कट्टे येण्याचे प्रमाण लक्षणीय असल्याचे पुढे आले आहे. 

मध्यप्रदेशातून आणतात कट्टे
पुणे जिल्ह्यात दहशत राहावी व प्रसंगी वापर करता यावा या साठी मध्यप्रदेशातून गावठी कट्टे आणले जातात तर काही जण डझनाने कट्टे आणून येथे जादा दराने त्याची विक्री करत असल्याचा गंभीर प्रकार या तपासात समोर आला आहे. या पुढील काळात कट्ट्यांची ही विक्री रोखण्याचे आव्हान ग्रामीण पोलिसांपुढे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police seize live cartridges in Baramati