टेम्पोमध्ये होता २२ लाखांचा गुटखा; मग पोलिसांनी...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 April 2020

पोलिसांची दिशाभूल करत तब्बल 540 किमीचे अंतर पार करुन आलेल्या गुटखा वाहतुकीच्या आयशर टेम्पोवर छापा टाकत बारामती गुन्हे शाखेने त्यांचा डाव हाणून पाडला.

बारामती : लॉकडाऊनच्या काळातील अनेक ठिकाणची नाकाबंदी मोठ्या शिताफीने चुकवून पोलिसांची दिशाभूल करत तब्बल 540 किमीचे अंतर पार करुन आलेल्या गुटखा वाहतुकीच्या आयशर टेम्पोवर छापा टाकत बारामती गुन्हे शाखेने त्यांचा डाव हाणून पाडला. याप्रकरणी अवैधरित्या वाहतूक करीत असलेला 22 लाख 27 हजारांचा गुटखा व टेम्पो पोलिसांनी जप्त केला आहे. 

अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन बारामती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, यवतचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, फौजदार सोमनाथ वाघमोडे, पोलिस कर्मचारी सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे,  चालक रमेश मोरे, रामदास घाडगे पोलिस जवान संपत खबाले, रमेश कदम, जितेंद्र पानसरे, अजित काळे, प्रशांत कर्णवर यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

पुणे-सोलापूर महामार्गावर पाटस टोलनाक्याजवळ पोलिसांना या टेम्पोचा संशय आल्यावर चौकशी करण्यात आली. सुरवातीला यातील चालक व इतरांनी बिस्कीटची वाहतूक करत असल्याचे सांगितले. मात्र, सखोल चौकशी केल्यानंतर यातून गुटखा चालविल्याचे उघड झाले. 

सिकंदराबाद येथून पुण्याच्या दिशेने हा टेम्पो निघाला होता. सिकंदराबादपासून अनेक पोलिस चेकपोस्टवर पोलिसांची दिशाभूल करत 540 किमीचे अंतर पार करुन हा टेम्पो पाटस टोलनाक्यापर्यंत पोहोचला होता. मात्र, पोलिसांच्या अचूक नजरेने हा टेम्पो हेरला आणि हा गुटखा पोलिसांच्या ताब्यात आला. 

दरम्यान, या प्रकरणी मानसिंग  खुदहरणसिंग कुशवाहा (वय 50 रा. गाझीपुर उत्तर प्रदेश), शीलदेव कृष्ण रेड्डी(रा.  सिकंदराबाद) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Seized Gutkha of Rs 22 Lakhs in Baramati