अपघातात पोलिस कर्मचारी गंभीर जखमी; पण...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 April 2020

बारामतीत पोलिस बंदोबस्तावर असलेले पोलिस कर्मचारी एम.डी. पवार हे काल रात्री बंदोबस्त संपवून दुचाकीवरुन घरी निघाले होते. जळोची लाकडी रस्त्यावर त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.

बारामती : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांना मात्र समाजाकडून दिलासा मिळत नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. बारामतीनजीक जळोची लाकडी रस्त्यावर एका पोलिस कर्मचाऱ्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला. मात्र, अपघातानंतर या पोलिसाला दवाखान्यात नेण्याचे सौजन्य संबंधित वाहनचालकाने दाखविले नाही, तो पसार झाला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामतीत पोलिस बंदोबस्तावर असलेले पोलिस कर्मचारी एम.डी. पवार हे काल रात्री बंदोबस्त संपवून दुचाकीवरुन घरी निघाले होते. जळोची लाकडी रस्त्यावर त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला मार बसला असून, त्यांना पुढील उपचारार्थ पुण्याला हलविण्यात आले आहे. जखमी झाल्यानंतर किमान पोलिसाला तातडीने दवाखान्यात पोहोचविण्याची माणुसकी संबंधित वाहनचालकाने दाखवायला हवी होती. मात्र, कारवाईच्या भीतीपोटी तोही पळून गेला. 

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील, फौजदार पद्मराज गंपले यांनी दवाखान्यात धाव घेतली. गंभीर स्थितीतील या पोलिस कर्मचाऱ्याला तातडीने पुण्याला हलविण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Serious Injured in Accident in Baramati