पुणे ग्रामीण पोलिसांचा अर्धा कारभार आता बारामतीतून   

मिलिंद संगई
Friday, 28 August 2020

कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी पुणे जिल्ह्यात बारामतीजवळच्या बऱ्हाणपूर येथे पोलिस उपमुख्यालय स्थापन करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. या संदर्भातील अध्यादेश आज जारी करण्यात आला. 

बारामती (पुणे) : कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी पुणे जिल्ह्यात बारामतीजवळच्या बऱ्हाणपूर येथे पोलिस उपमुख्यालय स्थापन करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. या संदर्भातील अध्यादेश आज जारी करण्यात आला. 

पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली, खडकवासला प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत जादा पाणीसाठा

राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक व इतर कारणांमुळे पुणे जिल्ह्यात पुण्याखालोखाल सर्वात मोठे शहर म्हणून बारामतीचा नावलौकीक आहे. एज्युकेशन हब म्हणूनही बारामतीची नवीन ओळख आहे. जिल्हा स्तरावरील सर्व सुविधा बारामतीत आहेत, या पार्श्वभूमीवर बारामतीत पोलिस उपमुख्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव गेले अनेक दिवसांपासून होता. उपमुख्यमंत्री अजित पवार हेही या बाबत आग्रही होते. मध्यंतरी राज्यातील सत्तांतरानंतर बऱ्हाणपूर येथील जागा ताब्यात मिळाली होती. मात्र, या प्रकल्पाचे काम काहीसे संथ झाले होते. मात्र, उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर लगेचच अजित पवार यांनी या कामाला गती देण्याची प्रक्रीया सुरु केली होती. आज अखेर पोलिस उपमुख्यालय सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. 

बारामतीकरांसाठी मोठी बातमी, टोलबाबत राज्य सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

पुणे जिल्ह्यातील दक्षिणेकडील हद्दीपर्यंत बंदोबस्त द्यावा लागल्यास बंदोबस्त पोहोचण्यास विलंब होतो, या साठी बऱ्हाणपूर येथे पोलिस उपमुख्यालय निर्माण झाल्यास कायदा व सुव्यवस्था टिकविण्यासाठी मनुष्यबळ त्वरित उपलब्ध होईल व परिस्थिती नियंत्रणात आणणे सहजतेने शक्य होईल, अशी भूमिका या मागे होती. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आज राज्य सरकारने याला मंजूरी देताना येथे आवश्यक पदनिर्मितीबाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील, पोलिस उपमुख्यालयाचे क्षेत्र व सीमा घोषित करण्याबाबत अधिसूचना यथावकाश निर्गमित करण्यात येईल, या पोलिस उपमुख्यालयाकरीता प्रशासकीय इमारत व इतर अनुषंगिक अनावर्ती खर्च सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता घेऊन वार्षिक योजनेतून करावा, असे अध्यादेशात नमूद केले आहे. 

हा होईल फायदा
बारामतीसह इंदापूर, दौंड, पुरंदर या चार तालुक्यांना या उपमुख्यालयाचा फायदा होईल. मनुष्यबळ तातडीने उपलब्ध होण्यासह कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी या उपमुख्यालयातील पोलिस बळ महत्वाची भूमिका बजावेल. या शिवाय बारामती- पाटस रस्त्यावर हे पोलिस उपमुख्यालय होणार आहे. त्यामुळे या रस्त्याच्या विकासासाठीही आपोआपच गती मिळणार आहे. 

• बारामतीपासून सात किलोमीटर अंतरावर बऱ्हाणपूर
• सत्तर एकर जागा उपलब्ध होणार, या पैकी 50 एकर जागा ताब्यात घेणार.
• प्रशासकीय इमारत, परेड ग्राऊंडची निर्मिती होणार.
• उपमुख्यालयात हेलिपॅडचीही निर्मिती होणार. 
• 300 कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या इमारती होणार.
• प्रशिक्षण केंद्र कँटीन मल्टीपर्पज हॉल.
• गोळीबार सराव केंद्र.
• पोलिस वाहनतळ व देखभाल व दुरुस्ती.
• संरक्षक भिंत उभारणीची निविदा प्रक्रिया सुरु. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The police sub-headquarters will be started in Baramati