
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर (ता.आंबेगाव) येथे पोलीस गाडीसह उभे असलेले पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हाताचा इशारा करून वाहन थांबविले.
पोलिसांनी थांबण्याचा इशारा करताच वाहन चालकांची उडाली तारांबळ
मंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर (ता.आंबेगाव) येथे पोलीस गाडीसह उभे असलेले पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हाताचा इशारा करून वाहन थांबविले. त्यामुळे आपली काहीतरी चूक झाली. असे समजून वाहन चालकांची तारांबळ उडाली. पण पोलीस अधिकारी सतीश होडगर यांनी हातात फूल देऊन जागतिक चालक दिनानिमित्त शुभेच्छा.असे सांगताच वाहन चालक भारावून गेले. मंचर पोलिसांनी राबवलेल्या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले आहे.
जागतिक चालक दिनानिमित्त मंचर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस नाईक व रस्त्यावरील ५० वाहन चालकांचा सन्मान मंचर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आला. मंचर (ता.आंबेगाव) येथील पोलीस ठाण्यात शनिवारी (ता.१६) जागतिक चालक दिनानिमित्त पोलीस निरीक्षक सतीश होडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर, उपपोलीस निरीक्षक रूपाली पवार यांच्या हस्ते पोलीस नाईक राजेश तांबे, शरद कुलवडे, संतोष कोकणे या पोलीस वाहन चालकांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे, पोलीस उपनिरीक्षक मयुरी तुरे, सोमनाथ वापगावकर, राजेश नलावडे उपस्थित होते. राजेश तांबे यांनी मनोगत व्यक्त करून झालेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
त्यानंतर पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर होडगर यांच्यासह पोलीस गेटवेल हॉस्पिटल, मंचर बसस्थानक परिसरात गेले. तेथे अनेक वाहने थांबून चालकांचा गुलाबाची फुले देऊन सन्मान केला. अनाहूतपणे झालेल्या स्वागताने चालकही भारावून गेले.